मराठा तरुणांना व्यवसायासाठी येथे मिळतोय मदतीचा हात

मराठा तरुणांना व्यवसायासाठी येथे मिळतोय मदतीचा हात

कोल्हापूर : कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत कोल्हापूर राज्यात आघाडीवर आहे. राज्यातील आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने 1998 साली हे महामंडळ स्थापन केले होते. मात्र, प्रत्यक्षात 2018 पासून महामंडळाला पुनर्जीवित करण्यात आले.

कोल्हापूर जिल्ह्यात 897 कोटींचे कर्ज वितरित

कोल्हापूर जिल्ह्यात महामंडळ अंतर्गत वैयक्तिक कर्ज योजनेतून 10,543 लाभार्थ्यांना 897 कोटी 42 लाख 38 हजारांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे; तर महामंडळाकडून व्याज परतावा मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना 84 कोटी 88 लाख 21 हजारांची रक्कम अदा करण्यात आली आहे. कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा क्रमांक राज्यात पहिला आहे.

महामंडळाचा उद्देश

मराठा समाजातील आर्थिकदृष्ष्ट्या मागास असलेल्या घटकांपर्यंत विशेषकरून बेरोजगार तरुणांपर्यंत पोहोचून त्यांना सक्षम बनविणे, योजना राबवून रोजगाराच्या व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, आर्थिकदृष्ट्या मागास घटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे हा आहे.

कोणाला मिळणार कर्ज

अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. लाभार्थी वयोगट मर्यादा पुरुषांसाठी 18 ते 50, तर महिलांसाठी 18 ते 55 वर्ष आहेे. लाभार्थ्याने महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

गट कर्ज लाभार्थ्यांना 1 कोटी 70 लाख अदा

जिल्ह्यातील गट कर्ज व्याज परतावा योजनेसाठी बँक कर्ज मंजुरी लाभार्थी संख्या 69 आहे; तर व्याज परतावा झालेली रक्कम 1 कोटी 70 लाख 72 हजार रुपये इतकी आहे.

गट प्रकल्प कर्ज योजनेसाठी पात्रता

कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत (सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार) असलेल्या उमेदवारांच्या पात्र शेतकरी उत्पादक (F. P. O.) गटांना रु. 10 लाखांपर्यंत बिनव्याजी दराने कर्ज रक्कम उद्योगाकरिता देण्यात येते. ऑनलाईन अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्डची प्रत (पाठपोठ-कुटुंब सदस्यांची नावे असलेली बाजू), रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला (वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त नसावे), जातीचा दाखला, वयाचा दाखला, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, प्रकल्प अहवाल.

इथे करा ऑनलाईन अर्ज

महामंडळाच्या योजनांची संपूर्ण यंत्रणा व कार्यपद्धती ही ऑनलाईन असून, पूर्णपणे पारदर्शक आहे. ही योजना लाभार्थीभिमुख असून, लाभार्थ्यांसाठी सर्व माहिती www.udyog.mahaswayam.gov.in. या संकेतस्थाळावर उपलब्ध करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news