एकी ठेवा; आरक्षण मिळवूच : मनोज जरांगे

एकी ठेवा; आरक्षण मिळवूच : मनोज जरांगे
Published on
Updated on

लोणावळा, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजातील शेवटच्या घटकाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत गप्प बसणार नाही. आपल्यातील एकजूट टिकवून ठेवा. हे आंदोलन शांततेत करून आरक्षण मिळवूच. यातून आपल्याला इतिहास घडवायचा आहे, असा निर्धार मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी गुरुवारी वाकसई-लोणावळा येथे केले.

मावळ तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने वाकसई येथे त्यांची सभा झाली. सकाळी 9 वाजता ही सभा सुरू झाली. या सभेला लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. याप्रसंगी मराठा बांधवांना संबोधित करताना महाराष्ट्र आमचा, मुंबई आमची अन् जनताही आमचीच आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मी थांबणार नाही, असे त्यांनी सांगितले.

आपल्या आंदोलनामुळे सरकारला कळेल की, जेव्हा मराठा एकवटतो तेव्हा तो इतिहास घडवतो. आपल्या आंदोलनात कोणी जाळपोळ करत असल्यास त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या. आपल्या नावाखाली कोणी राजकीय पोळी भाजत असल्यास त्यांना तिथेच थांबवा, असेही त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितले.

जरांगे म्हणाले, मराठा आरक्षण शेवटच्या टप्प्यात आले आहे. मुंबईत शांततेत आंदोलन करायचे आहे. गेली 70 वर्षे आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत येत नव्हते. मराठा आरक्षणाद्वारे 54 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे मिळवून द्यायची आहेत. तसेच, त्यांच्या गणगोतांनादेखील हे आरक्षण मिळाले पाहिजे. ओबीसीतूनच हे आरक्षण हवे. मराठा समाजापुढे अनेक प्रश्न आहेत. सध्या आपण हाती घेतलेले आंदोलन मराठा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत आरक्षण पोहोचत नाही, तोपर्यंत मागे घेणार नाही. अंतरवाली सराटीत अजूनही आंदोलन सुरू आहे. मराठा समाजापुढे अनेक प्रश्न आहेत. त्यांचीदेखील आपल्याला सोडवणूक करायची आहे, असे त्यांनी सांगितले.

मुक्काम व जेवणाची व्यवस्था

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या मुक्कामाची व रात्रीच्या जेवणाची व्यवस्था सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली. त्यासाठी घरटी 25 चपात्या व शेंगदाणा चटणी यांचे नियोजन करण्यात आले होते. सभेच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, आरोग्यविषयक सुविधा, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, स्वच्छतागृह आणि स्नानगृहाची सोय, पार्किंग व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

शिष्टमंडळाशी चर्चा निष्फळ

सभेनंतर शासनाच्या तीन सदस्यीय शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली. काही वेळ झालेल्या चर्चेमध्ये कोणताही मार्ग न निघाल्याने गाड्यांची तोंडे मुंबईच्या दिशेला करा, आपल्याला शांततेच्या मार्गाने आरक्षण मागायला जायचे आहे, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news