मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : लाखोंच्या संख्येने निघालेले मराठा समाजाचे वादळ शुक्रवारी (दि. 26) मुंबईत धडकणार असताना आझाद मैदानात उपोषण करण्यास पोलिसांनी मनोज जरांगे यांना नोटीस बजावून मनाई केली आहे. त्यांना नवी मुंबई, खारघर येथील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्कवर उपोषण करण्याचा पर्याय सुचविण्यात आला आहे. मात्र, जरांगे हे आझाद मैदानावरच उपोषण करण्यावर ठाम असून, मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनीही तशी तयारी सुरू केली आहे.

जरांगे यांचे मुंबईतील उपोषण रोखण्यात सरकारला अपयश आल्यास मुंबईची कोंडी होणार आहे. जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनामुळे मुंबईकरांना त्रास होणार असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा मुद्दा उपस्थित करत या आंदोलनास परवानगी नाकारण्यासाठी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर जरांगे यांच्या आंदोलनास प्रतिबंध करण्यास न्यायालयाने नकार दिला. मात्र, मुंबईतील सार्वजनिक रस्त्यावर आम जनतेची कसलीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेऊन जरांगे यांना आंदोलनासाठी योग्य जागा सुचविण्याचे आदेश दिले आहेत. हे आंदोलन मुंबईत झाल्यास सारी व्यवस्था कोलमडून पडण्याची शक्यता असल्यामुळे जरांगे यांना उपोषणास परवानगी नाकारण्यात आली आहे. तेथे उभारलेले व्यासपीठही काढण्यास सांगितले आहे.

जरांगे मुंबईत येण्यावर ठाम

जरांगे आझाद मैदानावरच आंदोलन करण्यावर ठाम आहेत. आझाद मैदानातील एका बाजूला आंदोलन करण्यासाठी परवानगी दिली आहे. तिथे व्यासपीठ उभारणीचे कामही सुरू आहे. त्यामुळे मी नवी मुंबईतून आझाद मैदानावरच जाणार आहे. आमचे व मुंबईकरांचे हाल होऊ नयेत, याची काळजी घेणे सरकारची जबाबदारी आहे. आम्ही मुंबईच्या वाटेवर असताना मागण्या पूर्ण केल्या, तरच आम्ही माघारी फिरू; अन्यथा मुंबईत येण्यावर मी ठाम आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

आम्हाला रोखता येणार नाही

मुंबईतील मराठा मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी सांगितले की, आम्हाला आझाद मैदानात आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी मिळाली आहे. तेथे आम्ही जरांगे यांच्या उपोषणासाठी व्यासपीठही उभारले आहे. त्या ठिकाणी पाच ते सात हजार लोक बसतील हे खरे असले, तरी अन्य लोकांना येण्यापासून आम्हाला रोखता येणार नाही. सरकारने आम्हाला आधीच तशी जागा निश्चित करून द्यायला हवी होती. आम्ही त्यासाठी सरकारला पर्याय दिले होते. आता आझाद मैदानातच उपोषण होणार, असे त्यांनी स्पष्ट केले.

…म्हणून परवानगी नाकारली

मुंबईची भौगोलिक स्थिती, लोकसंख्या, वाहनांची संख्या, अरुंद रस्ते, रुग्णांची हेळसांड आदी कारणास्तव सार्वजनिक सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार आहे. मुंबईमधील कोणत्याही मैदानामध्ये एवढ्या आंदोलकांना सामावून घेण्याची क्षमता नाही. आंदोलन अनिश्चित काळासाठी असल्याने त्यासाठी आवश्यक सोयीसुविधा दीर्घकाळ मुंबईमध्ये पुरवणे शक्य होणार नाही. त्याचा परिणाम सार्वजनिक सुविधांवरही होणार आहे. म्हणूनच न्यायालयाने योग्य जागा सुचविण्यास सांगितल्यानुसार खारघर येथील जागेचा पर्याय जरांगे यांना दिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news