थंडीची हुडहुडी… थर्माकॉलच्या बॉक्सवर चादरींचा ढीग!

थंडीची हुडहुडी… थर्माकॉलच्या बॉक्सवर चादरींचा ढीग!

नवी दिल्ली : सोशल मीडियात अनेक भन्नाट व्हिडीओ पाहायला मिळत असतात. लोक काय करतील आणि काय नाही, हे आता खरोखरच सांगता येणे कठीण झाले आहे. सध्या थंडी वाढत आहे आणि एका पठ्ठ्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी जो उपाय केला त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या माणसाने बेडवरच थर्माकॉलचा बॉक्स ठेवून त्यावर चादरींचा ढीग रचला आणि त्यामध्ये झोपणे पसंत केले!

थंडीचा कडाका वाढत असल्याने विशेषतः सकाळी व रात्री बाहेर फिरत असताना ऊबदार कपड्यांचा आधार घेतला जात असतो. वर्षभर कपाटात पडून असलेले स्वेटर्स, मफलर, कानटोप्या, हातमोजे अशा वेळी बाहेर येतात. रात्रीच्या वेळीही थंडी बरीच असल्याने चादरीवर चादरी किंवा ब्लँकेट घेऊन झोपणारे अनेक असतात. मात्र या माणसाने जो उपाय केला तो पाहून लोकांची चांगलीच करमणूक झाली. त्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी थर्माकॉलचा बॉक्स बनवला.

या बॉक्सवर त्याने चादरींचा ढीगच रचला आणि तो स्वतः बॉक्समध्ये झोपला. व्हिडीओच्या शेवटी तो बॉक्स बंद करून झोपी गेल्याचे दिसते. अनेकांना हा जुगाड पाहून गंमत वाटली. हा व्हायरल व्हिडीओ 80 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून त्याबाबत भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. अर्थातच या माणसाचा हा प्रकार गमतीचाच एक भाग आहे, त्यामधून थंडी आणि लोकांची थंडीपासून बचाव करण्याची धडपड दिसते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news