Manoj Jarange-Patil : अंतरवाली ते मुंबई असा असणार मनोज जरांगे -पाटील यांचा प्रवास

Manoj Jarange-Patil : अंतरवाली ते मुंबई असा असणार मनोज जरांगे -पाटील यांचा प्रवास

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही २० जानेवारीला अंतरवाली सराटीतून निघणार आहे. २६ जानेवारीला आमचा मार्चा मुंबईत धडकेल. शिवाजी पार्क किंवा आझाद मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आमरण उपोषणाला आम्ही सुरुवात करणार, अशी घोषणा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे -पाटील यांनी आज (दि.१५) केली. Manoj Jarange-Patil

मुंबईतील आंदोलनाची दिशा कशी असेल आणि अंतरवाली ते मुंबई पायी जाण्यासाठी मुक्कामाचे टप्पे कोणते असतील, याची माहिती अंतरवालीत पत्रकार परिषद घेऊन जरांगे-पाटील यांनी दिली. Manoj Jarange-Patil

२० जानेवारीला सकाळी ९ वाजता अंतरवाली येथून मोर्चा निघणार आहे. दुपारचे जेवण गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे होणार आहे. तर पहिल्या दिवसाचा मुक्काम हा जरांगे यांच्या शिरूर कासार तालुक्यातील मातोरी या मूळ गावात असणार आहे. आंदोलकांसाठी गावागावात जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

मोर्चात पुण्यातून समाज बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी होतील. एक कोटीची संख्या तिथेच पार होणार आहे. आम्ही स्वयंसेवक घेतलेले नाहीत. प्रत्येकाने आपले नियोजन करायचे आहे. ज्या ठिकाणी मुक्काम आहे, त्या ठिकाणी गावकऱ्यांकडून जेवणाची सोय होणार आहे.
मुंबईला जाणारे प्रत्येकजण आपल्या वस्तू सोबत घेणार आहेत. त्यांनी झोपताना आपल्या वाहनाजवळ झोपायचे आहे. कुणीही व्यसन करायचे नाही. ज्यांच्याकडे पाण्याचे टँकर असेल, जनरेटर असेल त्यांनी ते घेऊन यावे. आंदोलनाला कोणी गालबोट लावत असेल, तर त्याला पोलिसांचा ताब्यात द्या .

दररोज ७० ते १०० किलोमीटर चा प्रवास करायचा आहे.

मुक्कामाच्या ठिकाणाहून सकाळी निघाल्यावर ज्यांना शक्य असेल, त्यांनी चालायचंय आणि ज्यांना शक्य नाही, त्यांनी गाडीत बसून प्रवास करायचा आहे. दररोज दुपारी १२ वाजेपर्यंत चालायचं आहे. १२ नंतर सर्वांनी आपापल्या वाहनात बसून पुढील प्रवास हा गाडीने करायचा, असेही त्यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यातील मराठा बांधवांनी त्यांच्या गावाच्या हद्दीपर्यंत मराठा आरक्षण आंदोलकांसोबत चालायचे आहे. अंतरवलीमधून आम्ही निघणार आहोत, मग सोबत एक लाख असोत किंवा एक कोटी असो, त्याचा विचार आम्ही करणार नाही. मराठा समाज मुंबईला जाणारच, मराठ्यांनी मुंबईला जाण्याच्या तयारीला लागा. तसेच सर्वांनी मुंबईकडे चला, असे आवाहन जरांगे -पाटील यांनी केले आहे.

शिवाजी पार्क व आझाद मैदान ही दोन्ही मैदानं आम्हाला लागतील. मी आणि माझा समाज उपोषणाला जाणार आहोत. आम्हाला कुणीही आडवणार नाही. सरकारने पुन्हा अंतरवाली च्या घटनेची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करू नये. तसे झाल्यास राजकारणात तुमचा नामोनिशाण दिसणार नाही, हे ध्यानात ठेवा, असा इशारा पण त्यांनी सरकारला दिला आहे.

ट्रॅक्टर, तीन चाकी रिक्षा, चारचाकी वाहने, टेम्पो, ट्रक या सह शेतकऱ्यांची सर्व वाहने सोबत राहणार. डॉक्टरांचे पथक सोबत राहणार, रुग्णवाहिका, पाण्याच्या टाक्या, जनरेटर सोबत घ्या. खाण्यापिण्याच्या सामानासह जे आपल्याला लागेल ते सर्व साहित्य सोबत घ्यावे, असे आवहान जरांगे यांनी केले.

Manoj Jarange-Patil : असा असेल मुंबई मोर्चा

२० जानेवारी रोजी अंतरवालीहून ९ वाजता निघाल्यावर दुपारचे जेवण गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे तर मुक्काम जरांगे यांच्या मूळगावी म्हणजे शिरुर तालुक्यातील मातोरी येथे होणार आहे.

२१ जानेवारी मातोरी ते तनपुरवाडी ता.पाथर्डी येथे दुपारी जेवण तर मुक्काम करंजी घाट बारा बाभळी (नगर जिल्हा) येथे असणार आहे.

२२ जानेवारी रोजी बारा बाभळी येथून निघायचे आणि मुक्काम पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथे होणार आहे.

२३ जानेवारी रोजी रांजणगाव इथून निघून भीमा कोरेगाव येथे दुपारचे जेवण असेल. चंदननगर खराडी बायपासजवळ मुक्काम असणार आहे.

२४ जानेवारीला खराडी बायपासहून सकाळी ८ वाजता निघायचे आहे. दुपारचे जेवण तळेगाव दाभाडेमध्ये होणार आणि मुक्काम लोणावळ्यात असणार आहे.

२५ तारखेला लोणावळाहून निघणार आणि पनवेलला दुपारचे जेवण होणार. यावेळी मुक्काम वाशीला असेल.

२६ जानेवारीला वाशी ते मुंबईत शिवाजी पार्क किंवा आझाद मैदानावर उपोषण सुरू होईल. वाशी ते चेंबूरपर्यंत वाहनाने जाणार आणि चेंबूर ते उपोषण स्थळा पर्यंत सर्व मराठे पायी जाणार.ही आपली शेवटची लढाई आहे असे ही मनोज जरांगे यावेळी म्हणाले.

असा असणार मार्ग

२० जानेवारी पहिला मुक्काम- बीड तालुक्यातील शिरूर मातोरी डोंगर पट्ट्यात. (बीड)
२१ जानेवारी दुसरा मुक्काम – करंजी घाट, बारा बाभळी (नगर)
२२ जानेवारी तिसरा मुक्काम-रांजणगाव (पुणे जिल्हा)
२३ जानेवारी चौथा मुक्काम – खराडी बाय पास, (पुणे)
२४ जानेवारी ५ वा मुक्काम- (लोणावळा)
२५ जानेवारी ६ वा मुक्काम – वाशी, (नवी मुंबई)
२६ जानेवारी ७ वा मुक्काम आझाद मैदान आंदोलन स्थळी

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news