Manoj Jarange-Patil | …तर मुंबईचा दूध, धान्य, भाजीपाला बंद करू : मनोज जरांगे- पाटील | पुढारी

Manoj Jarange-Patil | ...तर मुंबईचा दूध, धान्य, भाजीपाला बंद करू : मनोज जरांगे- पाटील

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: आमचा लढा आरक्षणासाठी असून आम्हाला मुंबईला जाण्याची हौस नाही. आम्हाला सरकारने मुंबईला जाताना रोखले, ट्रॅक्टर, गाड्यांना डिझेल दिले नाही. तर आम्ही शेतकरी आहोत, मुंबईचे दूध, धान्य, भाजीपाला बंद करू, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांनी राज्य सरकारला दिला. मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची नियोजन बैठक अंतरवाली सराटीत आज (दि.३) झाली. यावेळी ते बोलत होते.  Manoj Jarange-Patil

मुंबईतील मराठा बांधव व समन्वयक पंचवीस ते तीस वाहनाच्या ताफ्यासह अंतरवाली सराटीत दाखल झाले. या सर्व समन्वयकांची आणि जरांगे- पाटील यांची मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक पार पडली. यामध्ये मुक्कामाचे ठिकाण, राहण्याची, जेवणाची, पाण्याची व्यवस्था यावर चर्चा झाली. Manoj Jarange-Patil

यावेळी जरांगे- पाटील म्हणाले की, मुंबईतील मराठा समाजाने आंदोलकांच्या जेवण, पाणी, राहण्याची, बाथरूमची व्यवस्था करावी. नगर परिषद, महानगरपालिका यांना अर्ज करा. त्यांच्या कडून फिरते टॉयलेट घ्या, अशा सूचना त्यांनी मुंबईकरांना दिल्या. २० जानेवारीनंतर माझ्यासह सरकारकडे कुणीही चर्चेला जाणार नाही. हैद्राबादमध्ये पंचवीस खोल्या भरून पुरावे सापडले आहेत. समिती मराठवाड्यासह महाराष्ट्रात काम करणार आहे. पण २० जानेवारीच्या आत निर्णय घ्यावा, असे मी कालच्या बैठकीत सरकारला सांगितले आहे. आझाद मैदानाच्या २० किलोमीटर परिसरातील बीकेसी, शिवाजी पार्कसह सर्व मैदाने आपल्याला लागतील. दीड लाख स्वयंसेवक, ३ हजार महिला स्वयंसेवक, दीड हजार डॉक्टर लागतील. तसेच ५ हजार वकील आपल्या मदतीला ठेवा, असे जरांगे म्हणाले.

आमच्यात गट तट नाहीत. आमचा कोणत्याही व्यक्तीला विरोध नाही, प्रवृत्तीला विरोध आहे. मागील वेळी कुणी ही बैठका घेत होते, कुणी कुठे ही जात होता, आता तसे होणार नाही. काही चिंता करू नका.

मुंबई डॉक्टर असोसिएशनच्या वतीने ५ हजार डॉक्टरांची टीम तयार ठेवू. मुबलक औषधे, रुग्णवाहिका उपलब्ध करून देऊ, अनेक रुग्णालये राखीव ठेवू. मुंबईतील २ कोटी लोकसंख्येत ३० लाख मराठा समाज बांधव आहेत. तो सर्व समाज रस्त्यावर उतरवू, असे मुंबईकर समन्वयकांनी यावेळी सांगितले. नवी मुंबईतील ९० जणांना कलम १०७ नुसार नोटीस दिल्या आहेत. तरीही आम्ही घाबरणार नाही. आम्ही ताकदीने आंदोलनात उतरू, असा निर्धार मुंबईतील एका महिलेने यावेळी केला.

हेही वाचा 

Back to top button