चिल्लर महाराजांना मानत नाही; मनोज जरांगे-पाटील यांचा अंतरवालीतून पलटवार

file photo
file photo

अंतरवाली सराटी ः पुढारी वृत्तसेवा :  जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या आड लपून तुम्ही आंदोलन संपवू नका, हे पाप तुम्हाला फेडावे लागेल. हा सरकारचा ट्रॅप आहे. अजय बारस्कर यांच्यासोबत आणखी 10 ते 15 माणसे असून, ते मला बदनाम करत आहेत. त्यांना काहीही बोलूदे. मी असल्या चिल्लर महाराजांना मानत नाही, असा पलटवार मनोज जरांगे-पाटील यांनी बारस्कर महाराज यांच्यावर केला.
अंतरवाली सराटी येथे जरांगे पत्रकारांशी बोलत होते. मराठा आंदोलनात सक्रिय सहभाग असलेल्या अजय बारस्कर महाराज यांनी केलेल्या आरोपांचा जरांगे यांनी जोरदार समाचार घेतला.

संबंधित बातम्या 

यापूर्वीच माफी मागितली आहे

मी उपोषण करत होतो. त्यामुळे माझ्या तोंडून त्या दिवशी अनावधानाने तुकाराम महाराज यांच्याबद्दल शब्द गेला. त्या वाक्याबद्दल माझी यापूर्वीच मी सपशेल माफी मागितली आहे. मात्र, उपोषण काळात बारस्कर यांनी मला पाणी पिण्याचा आग्रह धरला. मला पाणी पाजून त्यांना मोठे व्हायचे होते. मात्र, तेव्हाच मी त्यांना तेथून हाकलून लावले. त्या संतापातून माझ्यावर आरोप केले जात आहेत. हे षड्यंत्रही त्यातूनच सुरू झाले आहे, असे मनोज जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले.

तो तर 'बावळटकर'

बारस्कर यांचा एकेरी उल्लेख करत जरांगे म्हणाले, हा कसला महाराज आहे. तो बावळटकर आहे. त्यांच्या मागे असलेले नेते, मंत्री मला माहीत आहे. त्यांनी मला शिकवण्याचा प्रयत्न करू नये. मी हेकेखोर नसून समाजासाठी कट्टर आहे; मात्र तुकाराम महाराजांच्या आडून मला बदनाम करू नये. सरकारने माझ्याविरुद्धचे हे षड्यंत्र थांबवले पाहिजे. तसे झाले नाही, तर मी त्या मंत्र्याचे नावही जाहीर करेन, असा इशाराही जरांगे यांनी दिला. मला बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी मी घाबरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news