मनोज जरांगे यांचे अजून अण्णा हजारे झालेले नाहीत : डॉ. कुमार सप्तर्षी

कुमार सप्तर्षी
कुमार सप्तर्षी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  प्रगत मराठ्यांनी त्यांच्यातीलच वंचित आणि हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या मराठ्यांना स्वीकारले नाही. संधीची कवाडे नाकारलेल्या मराठ्यांमधील मनोज जरांगे हे अनगड नेतृत्व आहे. अण्णा हजारे आधी असेच अनगड होते, पण ते जेव्हा राजकीय व्यक्तींच्या संपर्कात आले, तेव्हा काय झाले हे आपल्याला माहीतच आहे. मनोज जरांगे यांंचे अजून अण्णा हजारे झालेले नाहीत, अशी टिपण्णी युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी रविवारी केली.

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित 23 व्या साहित्यिक कलावंत संमेलनात 'आरक्षण आणि महाराष्ट्राचे भवितव्य' या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. या परिसंवादात सारंग दर्शने, डॉ. बाळासाहेब सराटे, प्रा. अविनाश कोल्हे सहभागी झाले होते. डॉ. सप्तर्षी म्हणाले, उच्चवर्णीय मराठ्यांनी फडणवीसांचे नेतृत्व स्वीकारले आहे. मराठ्यांमधील उतरंडीच्या क्रमानुसार खालच्या श्रेणीतील मराठ्यांना काळानुरूप राजकीय शहाणपण आले असून, ते त्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. प्रा. कोल्हे म्हणाले की, जागतिकीकरणानंतर सर्वच परिमाणे बदलली. सरकारने अनेक क्षेत्रांतून माघार घेत खासगीकरण केले. त्यामुळे सरकारी नोकर्‍या कमी झाल्या. सध्याची आरक्षणाकरिता सुरू असलेली भांडणे पाहून समोर असे काय आहे की, ज्यासाठी ही भांडणे सुरू आहेत, असा विचार  मनात येतो. दर्जेदार शिक्षणाचा अभाव हे आरक्षणामागील मूळ आहे. आपल्याला आपले अग्रक्रम तपासून पाहण्याची आणि बदलण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news