Mann Ki Baat: PM मोदींचा ‘मन की बात’मधून देशवासियांना आरोग्यमंत्र; म्हणाले ‘फिल्टर नाही, तर फिट…’

Mann Ki Baat: PM मोदींचा ‘मन की बात’मधून देशवासियांना आरोग्यमंत्र; म्हणाले ‘फिल्टर नाही, तर फिट…’

पुढारी ऑनलाईन डेस्क: आपल्या फिटनेससाठी काय चांगलं आणि काय वाईट हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. जसे आपण दिसता, तसे आनंदाने स्वीकारा. एखाद्या फिल्मस्टारचे शरीर पाहून नव्हे तर डॉक्टरांच्या सल्ल्याने जीवनशैली बदला. आजपासून फिल्टर जीवन न जगता, फिट (तंदुरुस्त) जीवन जगा, असा आरोग्यमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिला. ते आज (दि.३१) मन की बात या कार्यक्रमातून संवाद साधत होते. (Mann Ki Baat)

आरोग्याविषयी देशवासियांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले, नियमित व्यायाम आणि ७ तासांची पूर्ण झोप शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे. हे तंदुरुस्त राहण्यास देखील मदत करते. यासाठी खूप शिस्त आणि सातत्य आवश्यक आहे. जेव्हा तुम्हाला परिणाम दिसू लागतील, तेव्हा तुम्ही स्वतः रोज व्यायाम करायला सुरुवात कराल, असा सल्ला देखील बॉलीवूड अभिनेता अक्षर कुमार याने मन की बात वेळी पीए मोदी यांच्याशी संवाद साधताना दिला. (Mann Ki Baat)

वर्षातील शेवटच्या 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "भारत हा आत्मविश्वासाने भरलेला आहे, आत्मविश्वास हा विकसित भारत आणि स्वावलंबनाचा आत्मा आहे. आपल्याला 2024 मध्येही तीच भावना आणि गती कायम ठेवायची आहे. " पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 च्या शेवटच्या मन की बात भाषणाची सुरुवात 'फिट इंडिया'ने केली. 108 व्या एपिसोडमध्ये त्यांनी सांगितले की, शारीरिक तंदुरुस्तीसोबतच मानसिक आरोग्य देखील महत्त्वाचे आहे.

Mann Ki Baat: विश्वनाथन आनंदपासून अक्षय कुमारपर्यंत चर्चा

आपला फिटनेस दिनचर्या सामायिक करताना, ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदने दिवसभरात मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी किमान सात ते आठ तासांच्या झोपेचे महत्त्व सांगितले. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने देखील शारीरिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी योग्य आहाराचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी रसायनांवर अवलंबून राहण्यापासून आणि कृत्रिमरित्या प्रेरित शारीरिक सुधारणांपासून दूर राहून नैसर्गिक पद्धतींचा पर्याय निवडण्याचा सल्ला दिला.

क्रीडा विश्व अन् खेळाडूंचे मोदींकडून कौतुक

पीएम मोदी मन की बात कार्यक्रमात पुढे म्हणाले, "यावर्षी आमच्या खेळाडूंनीही खेळात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आमच्या खेळाडूंनी आशियाई खेळांमध्ये 107 पदके आणि आशियाई पॅरा गेम्समध्ये 111 पदके जिंकली. "भारतीय खेळाडूंनी क्रिकेट विश्वचषकात आपल्या कामगिरीने देशवासियांची मने जिंकली. आता 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकचे आयोजन केले जाणार आहे, ज्यासाठी संपूर्ण देश खेळाडूंना प्रोत्साहन देत आहे.

AI टूल्सबद्दलही 'मन की बात'मध्ये चर्चा

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सारख्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाने समाजातील विविध क्षेत्रांसाठी कशी सोय केली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. त्यांनी कासी-तमिळ संगम कार्यक्रमाची आठवण करून देत, जिथे स्वदेशी AI-शक्तीच्या अॅपने हिंदीतून तमिळमध्ये सहज अनुवाद केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अशा तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीनंतर न्यायव्यवस्था, शिक्षणासह विविध क्षेत्रांतील कामकाजात सुलभता येईल, असे देखील पीएम मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news