Generic medicine : रुग्णांना जेनेरिक औषधे लिहून देणे बंधनकारक

Generic medicine : रुग्णांना जेनेरिक औषधे लिहून देणे बंधनकारक
Published on
Updated on

नवी दिल्ली, पीटीआय : रुग्णांना जेनेरिक औषधे लिहून देणे (प्रिस्क्राईब) सर्व डॉक्टरांना बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय औषधांच्या ब्रँडचा उल्लेख प्रिस्क्रिप्शनवर करण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाईसह संबंधित डॉक्टर अथवा रुग्णालयाचा वैद्यकीय परवाना ठरावीक काळासाठी रद्द केला जाणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) जेनेरिक औषधांच्या प्रिस्क्रिप्शनसंदर्भात शनिवारी जारी केलेल्या नव्या नियमावलीत हा इशारा देण्यात आलेला आहे.

नोंदणीकृत वैद्यकीय अधिकार्‍यांच्या आचारसंहितेसाठी नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. डॉक्टर जेनेरिक औषधे लिहून देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे उघड झाल्यास संबंधित डॉक्टरांना पहिल्या टप्प्यात इशारा देण्यात येईल. संबंधितांना व्यावसायिक प्रशिक्षण आणि कार्यशाळांमध्ये सहभागी होण्याबाबत सूचना देण्यात येतील. यानंतरही डॉक्टरांनी एनएमसीच्या नियमावलीचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार असल्याचे या नियमावलीत म्हटले आहे.

प्रिंटेड प्रिस्क्रिप्शन देणे बंधनकारक

डॉक्टरांच्या हस्तलिखित प्रिस्क्रिप्शन कित्येक वर्षांपासून चर्चेचा विषय आहे. यावरही वैद्यकीय आयोगाने भाष्य केले आहे. डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन देताना चुका टाळल्या पाहिजेत. त्यासाठी डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन टाईप करून रुग्णांना प्रिंटेड चिठ्ठी द्यावी. प्रिस्क्रिप्शनबाबत डॉक्टरांना टेम्प्लेट (नमुना) उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याआधारे डॉक्टरांनी तर्कसंगतपणे जेनेरिक औषधे लिहून द्यावीत. जनऔषधी केंद्रासह अन्य जेनेरिक औषध दुकानांमधून औषध खरेदी करण्याबाबत रुग्णांना मार्गदर्शन करावे. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी आणि जनतेमध्ये जेनेरिक औषधांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडावी, असा सल्लाही एनएमसीने डॉक्टरांना दिला आहे.

इंडियन मेडिकल कौन्सिलने 2002 साली नियमावली जारी केली होती. मात्र, त्या नियमावलीत दंडात्मक तरतूद न केल्यामुळे डॉक्टर राजरोसपणे जेनेरिक औषधांच्या नियमावलीचे उल्लंघन करीत होते. त्यामुळे एनएमसीने नवीन नियमावली जारी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ब्रँडेड औषधांपेक्षा जेनेरिक औषधे 30 ते 80 टक्के स्वस्त

नियमावलीत पुढे नमूद केले आहे की, डॉक्टरांनी ब्रँडेड औषधे देण्याचे टाळावे. ब्रँडेड औषधांपेक्षा जेनेरिक औषधे 30 ते 80 टक्के स्वस्त असतात. जेनेरिक औषधे लिहून दिल्यास रुग्णांच्या आरोग्याच्या खर्चात बचत होण्यास मदत होईल. जेनेरिक औषधे गुणवत्तापूर्ण असतात. रुग्णांना ती योग्य दरात मिळतात. याउलट ब्रँडेड जेनेरिक औषधांचे उत्पादन ड्रग्ज कंपन्यांकडून होते आणि विक्री दुसर्‍याच कंपनीद्वारे नव्या ब्रँडखाली केली जाते. अशा कंपन्यांवर कमी प्रमाणात नियंत्रण असते. त्यामुळे त्यांच्या मनमानीमुळे किमतीमध्ये मोठी तफावत जाणवते. त्याचा रुग्णांवर भुर्दंड पडतो. फिक्स्ड डोस कॉम्बिनेशनच्या गोळ्या आणि अनावश्यक औषधे रुग्णांना लिहून देऊ नयेत, असेही या नियमावलीत म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news