पुढारी ऑनलाईन : जागतिक स्तरावर सध्या मंदीचे वातावरण आहे. यामुळे अनेक कंपन्या मोठ्या प्रमाणात नोकरकपात करत आहेत. विशेषतः ब्रिटनमध्ये आर्थिक मंदीचे सावट आणखी गडद बनले आहे. या पार्श्वभूमीवर आता जागतिक स्तरावरील अमेरिकेची मॅनेजमेंट कन्सल्टिंग फर्म मॅकिन्सेने (Management consulting firm McKinsey) शेकडो वरिष्ठ कर्मचाऱ्यांना स्वेच्छेने नोकरी सोडून जाण्यासाठी आणि इतर ठिकाणी नोकरी शोधण्यासाठी नऊ महिन्यांच्या paid leave ची ऑफर दिली आहे. मॅकिन्सेने नोकरी सोडण्यास इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांना करिअर कोचिंग सेवाही मिळेल, असेही म्हटले आहे. याबाबतचे वृत्त ब्रिटीश वृत्तपत्र द टाईम्सने दिले आहे.
मॅनेजमेंट कन्सल्टिंग क्षेत्रातील मंदीमुळे कंपनीने हे पाऊल उचलले आहे. ब्रिटनमधील कंपनीच्या विभागातील व्यवस्थापकांना अन्य ठिकाणी नोकरी शोधण्यासाठी नऊ महिने संपूर्ण पगाराची ऑफर दिली आहे. या कालावधीत कर्मचारी कंपनीच्या ग्राहक केंद्रीत प्रकल्पांवर काम करण्याऐवजी नवीन नोकरीच्या संधी शोधण्यासाठी त्यांच्या कामाच्या तासांचा वापर करू शकतात. या कालावधीत त्यांना पूर्ण पगार मिळेल. जर त्यांनी संपूर्ण नऊ महिन्यांचा कालावधी नोकरी शोधण्यासाठी वापरला तर त्यात लाखो पौंडांची भर पडेल, असे वृत्तात म्हटले आहे.
द टाईम्सने पुढे वृत्तात म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांना पूर्ण पगाराव्यतिरिक्त मॅकिन्से कंपनीच्या संसाधनांचा आणि करिअर कोचिंग सेवांचाही लाभ घेता येईल. पण, कर्मचाऱ्यांना या कालावधीत नवीन नोकरी मिळाली नाही तर तरीही मॅकिन्से कंपनी त्यांना सोडावीच लागेल.
ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, मॅनेजमेंट कन्सल्टिंग क्षेत्रातील मंदीमुळे मॅकिन्सेने यापूर्वीही नोकरकपात करण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या वर्षी कंपनीने सुमारे १,४०० नोकऱ्या कमी करण्याची योजना जाहीर केली होती. ही नोकरकपात त्यांच्या एकूण मनुष्यबळाच्या सुमारे ३ टक्के एवढी आहे.
फेब्रुवारीमध्ये ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तात म्हटले होते की मॅकिन्सेने (McKinsey) ३ हजार कर्मचाऱ्यांना कामाचा दर्जा खालावला असल्याचे सांगत या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी सुमारे तीन महिन्यांचा अवधी दिला होता. अथवा त्यांना आता कंपनी सोडण्याची सूचना दिली जाऊ शकते.
हे ही वाचा :