लंडन : कधी कधी आयुष्यात अत्यंत अनपेक्षित प्रसंग येत असतात. अशा प्रसंगांचा ठसा आजन्म मनावरही राहत असतो. एका 60 वर्षीय व्यक्तीने असाच चमत्कारिक अनुभव शेअर केला आहे. ब्रिटनमध्ये स्टेज अॅक्टर म्हणून काम करत असताना त्याला एक भयंकर अनुभव आला. या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मात्र, 7 मिनिटांनंतर तो पुन्हा जिवंत झाला. त्या 7 मिनिटांच्या काळात तो कुठे होता व काय करत होता याबाबत त्याने सविस्तर भाष्य केले आहे. या अनुभवांना 'आफ्टर लाईफ एक्सपीरियन्स' किंवा 'निअर डेथ एक्सपीरियन्स' असेही म्हटले जाते.
शिव यांनी त्यांच्या या अनुभवाबाबत सविस्तर भाष्य केले आहे. 9 फेब्रुवारी 2013 मध्ये त्यांना हार्टअॅटॅक आला होता. त्यावेळी ते लंडनमधील आपल्या घरात पत्नीसोबत जेवण करीत होते. जेव्हा त्यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा त्यांच्या पत्नीने एलिसनने रुग्णवाहिकेला फोन केला होता. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. शिव यांचा 'मृत्यू' झाला होता. त्यांना वेळेत उपचार मिळाले होते. मात्र, ते पुन्हा जिवंत होतील असे कोणालाच वाटले नव्हते. शिवने म्हटले आहे की, मला कळलं होतं की माझं निधन झालंय. माझ्या शरीरातून सगळं काही निसटत चाललंय याची जाणीव मला होत होती.
हा अनुभव शब्दांत मांडण्यात येत नाहीये. मला असं वाटतं होतं की मी झीरो आहे. मात्र, मी अजूनही भावना आणि संवेदना अनुभवू शकतो. मला पाण्यात पोहोत असल्यासारखं वाटत होतं. तुम्ही निवांत आहात आणि भौतिक जगापासून दूर आहेत. यावेळी तर मी जणू चंद्रावर फेरफटका मारत होतो आणि पूर्ण अंतराळ पाहू शकतोय, अशी जाणीव होत होती. शिव यांनी पुढे म्हटले आहे की, विभिन्न जीवन आणि पुनर्जन्म हे पूर्ण माझ्या अवतीभवती फिरत आहेत; पण मला हे सगळं नको होतं. मला पुन्हा माझ्या विश्वात परत जायचं होतं. मला माझे शरीर हवे होते.
माझी पत्नी माझी वाट पाहत होती, मला जगायचे होते. त्यानंतर माझ्या घरी रुग्णवाहिका आली आणि डॉक्टरांना पुन्हा माझ्या हृदयाचे ठोके सुरू करण्यात यश आले. माझ्यावर एक शस्रक्रियादेखील करण्यात आली. एकदा मरण अनुभवल्यानंतर आता आयुष्याकडे पाहण्याचा माझा द़ृष्टिकोनच बदलला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, मी आता मरणाला घाबरत नाही; पण त्याचबरोबर मी जास्त भयभीत आहे. कारण मला आता हे उमगलंय की माझ्या आयुष्यात जे काही आहे ते किती मोलाचे आहे. मी इथे जन्म घेण्यासाठी आभार मानतो!