पुणे: पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला जन्मठेप

पुणे: पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला जन्मठेप
Published on
Updated on

राजगुरूनगर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या ४५ वर्षीय नराधम बापाला राजगुरुनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. अंबाळकर यांनी मंगळवारी (दि. ९) जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

सन २०१९ मध्ये हा गुन्हा घडला होता. नोव्हेंबर २०१८ ते एप्रिल २०१९ या कालावधीत स्वतःच्या १६ वर्षीय मुलीवर बापाने वारंवार बलात्कार केला. आई घरातून कामाला गेल्यानंतर तो मुलीवर बलात्कार करायचा. याबाबत आईला काही सांगितल्यास मुलीसह आईला मारून टाकण्याची धमकी तो द्यायचा. त्याच्या या कृत्यामुळे मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर हा घृणास्पद प्रकार पुढे आला.

पीडित मुलीसह तिच्या आईने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी बापाच्या विरोधात भादंवि ३७६ ,५०४ व बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. नात्याला काळिमा फासणाऱ्या बापाला पोलिसांनी ३ मे २०१९ रोजी बेड्या ठोकून त्याला येरवडा तुरुंगात धाडले होते. तपास अधिकारी पोलीस उप निरीक्षक अनिल मोरे व सद्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास केला. तपासा अंती पीडित मुलीने बाळाला जन्म दिला होता. मात्र, ते मुल मयत झाले. त्याचा डीएनए, पीडित मुलीचा डीएनए व नराधम बापाचा डीएनए तपासण्यात आला. मयत अर्भकाचा बाप व पीडित मुलीचा बाप एकच असल्याचा भक्कम पुरावा पोलिसांना मिळाला होता.

हा खटला राजगुरूनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश ए. एम. अंबाळकर यांच्या पुढे सुरु होता. या खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता व्ही. एन. देशपांडे यांनी ११ साक्षीदार तपासले. नात्याला काळिमा फासणारा हा गुन्हा असून साक्ष, पुरावे भक्कम आहेत. आरोपीला दया दाखविण्यासारखी ही घटना नसून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा मिळण्यासाठी युक्तिवाद केला. यात पीडित मुलगी, तिची आई, डॉक्टर, तपास अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. न्यायाधीश ए. एम. अंबाळकर यांनी आरोपी बापाला जन्मठेप व ५ हजार रुपये दंड, भादंवि कलम ३७६ अन्वये १० वर्ष सक्षम कारावास व २ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. या खटल्याचे पोलीस कामकाज हवालदार एस. डी. सातपुते यांनी केले .

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news