नगर : पुढारी वृत्तसेवा
अल्पवयीन मुलीवरील अत्याचार केल्याच्या गुन्ह्याच्या सुनावणीदरम्यान पिडित व काही साक्षीदारांनी जबानी फिरविली, मात्र फिर्यादी असलेली पत्नी ठाम राहिली. प्रयोगशाळेचा पृथकरण अहवालाने आरोपी पतीला जिल्हा विशेष न्यायाधीश माधुरी बरालिया यांनी आरोपीला दोषी धरीत दहा वर्षे सक्तमजुरी व 11 हजारांचा दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रक्कमेतील तीन हजार रुपये फिर्यादी व पीडितेला देण्याचे आदेशात म्हटले आहे.
राहुरी तालुक्यातील एका गावातील 51 वर्षीय दिलीपला न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. दिलीप याने अंगावर रॉकेल ओतून पत्नीस जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसा गुन्हा त्याच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर फिर्यादीच्या मुलाचा 25 जानेवारी 2014 रोजी संशयीतरित्या मृत्यू झाला. त्यातही फिर्यादी पत्नीने पतीवर संशय घेतला होता. मला मुलगा पाहिजे, दुसरी बायको करण्याला संमती दे, असे तो नेहमी पत्नीला म्हणता होता. एकेदिवशी रात्री त्याने पीडित मुलीला घरी आणून पत्नीसमोरच तिच्यावर अत्याचार केला.
पत्नीने प्रतिकार केला असता पतीने पत्नीला लाथाबुक्क्याने मारहाण करून घराबाहेर काढले. त्यानंतर आरोपी व पीडित मुलीचे सुमारे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध चालू होते. त्यातून पिडीत मुलीस आरोपीपासून एक वर्षाचा मुलगा झाला, असे फिर्यादी पत्नीने फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पत्नीच्या फिर्यादीवरून पतीविरुध्द राहुरी पोलिस ठाण्यात अत्याचार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. विशेष न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले.
पीडित मुलगी व तिचा भाऊ यांनी आरोपीच्या बाजूने साक्ष दिली. परंतु, सरकार पक्षाने उलटतपासात त्यांची साक्ष खोडून काढली. सरकार पक्षाचा युक्तिवाद व पुरावे ग्राह्यधरून न्यायालयाने आरोपीला दोषी धरले आणि वरीलप्रमाणे शिक्षा केली. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अॅड. जी. के. मुसळे व अॅड. मंगेश दिवाणे यांनी बाजू मांडली.
https://youtu.be/7KwsutS10qQ