पुणे, पुढारी वृत्तसेवा: अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करून तिच्यावर अॅसीड सारखे काहीतरी फेकून जखमी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी एकाला बेड्या ठोकल्या आहेत. अक्षय राजु चव्हाण (24, रा. मारूती मंदिराजवळ, वडारवाडी, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा बिगारी कामगार आहे, तर अल्पवयीन पिडीत मुलगी शिक्षण घेत आहे. 29 जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पिडीत मुलगी ही चतुःश्रृंगी परिसरात एका ठिकाणी उभी होती. त्यावेळी आरोपीने तिच्याशी अश्लिल चाळे केले. आरोपीने तिला आपण फिरायला जाऊ म्हणत शरिर संबंधाची मागणी केली. यावर तिने त्याला विरोध केल्यानंतर त्याने त्याच्याजवळील अॅसीड मुलीवर फेकले व तिला जखमी करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आरोपी अक्षय चव्हाण याला चतुःश्रृंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अक्षय चव्हाण विवाहित असताना त्याने पिडीत मुलीला त्रास दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संशयीत आरोपीने केलेल्या अॅसीड हल्ल्यात तरूणी जखमी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रत्नदिप गायकवाड करत आहेत.