संदेशखाली प्रकरणाने ममता, तृणमूल काँग्रेस अडचणीत!

संदेशखाली प्रकरणाने ममता, तृणमूल काँग्रेस अडचणीत!
Published on
Updated on

पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखाली येथील तृणमूल काँग्रेसचा स्थानिक नेता शाहजहा शेखने अनेक महिलांचे लैंगिक शोषण करून त्यांच्या जमिनी बळजबरीने हडपल्याच्या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकारण तापले आहे.

शाहजहा शेखने केलेल्या अत्याचाराविरुद्ध स्थानिक जनतेने तीव्र आंदोलन केल्यानंतर राज्यात भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. महिला अत्याचाराच्या प्रकरणात तृणमूल काँग्रेसचा नेता अडकल्यामुळे भाजपने आयती संधी साधून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शाहजहा शेखच्या अमानुष कृत्यामुळे भाजपच्या हिंदुत्वावर कडाडून प्रहार करणार्‍या ममता बॅनर्जी बॅकफूटवर आल्या आहेत. शेखच्या सीबीआय चौकशीतून महिलांवरील लैंगिक शोषण आणि जमिनी बळकावल्याचे सत्य बाहेर आल्यास आगामी काळात ममतादीदींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

संदेशखाली येथील महिलांवरील लैंगिक शोषण आणि त्यांच्या जमिनी बळकावण्याच्या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टी. एस शिवगणम यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नुकतेच दिले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीवर आम्ही जातीने लक्ष घालणार आहोत, असे मुख्य न्यायाधीशांनी म्हटले आहे. तृणमूल काँग्रेसचा स्थानिक नेता शाहजहा शेख या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे. शेख याच्याविरोधात मनी लाँडरिंगप्रकरणी 'ईडी'नेही गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात त्याला अटक करण्यासाठी 'ईडी'चे पथक गेले असता, त्याच्या समर्थकांनी या पथकावर हल्ला चढविला होता.

या प्रकरणाचीही चौकशी सीबीआय करीत आहे. पश्चिम बंगालमधील कथित रेशन घोटाळ्यात शाहजहा शेख याचा सहभाग असल्यावरून 'ईडी'ने संदेशखाली येथील घरावर धाड टाकली होती. आता संदेशखाली गावातील महिलांनी शाहजहा शेख आणि त्याच्या सहकार्‍यांवर लैंगिक शोषणाचा आरोप करून त्याच्या अटकेची मागणी केली आहे. लैंगिक शोषण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याच्या मागणीसाठी कोलकाता उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेच्या सुनावणीत शाहजहा शेख याच्याविरोधात प्रतिज्ञापत्रांच्या माध्यमातून 600 तक्रारी न्यायालयाला प्राप्त झाल्या आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात पक्षातील एका स्थानिक नेत्याविरुद्ध जनतेने तक्रारी केल्यामुळे ममता बॅनर्जी बॅकफूटवर आल्या आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपने 'जय श्रीराम'चा नारा देऊन केलेल्या हिंदुत्वाच्या प्रचाराला समर्थपणे तोंड देऊन ममता बॅनर्जी यांनी आपला गड राखला होता. आता लोकसभा निवडणुकीतही भाजपने हिंदुत्वासोबतच पश्चिम बंगालमधील गुंडागर्दी, दहशत महिलांवरील अत्याचार आणि कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर तृणमूल काँग्रेसला घेरल्यामुळे ममतादीदींच्या अडचणी वाढल्या आहेत. सीबीआयने शाहजहा शेखला अटक केल्यानंतर तृणमूल काँग्रेसला महिला अत्याचाराच्या विषयावर कोंडीत पकडण्याची व्यूहरचना भाजपने आखली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news