नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या आहेत. या भेटीनंतर ममतादीदी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आल्या आहेत. अलीकडच्या काळात टीएमसी आणि भाजप नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवर मतभेद दिसून येत आहेत. ईडीच्या कारवाईबाबत टीएमसी नेत्यांनीही केंद्र सरकारला घेरले आहे.
महागाई, जीएसटी यांसारख्या मुद्द्यांवरून टीएमसी नेते सातत्याने भाजप सरकारवर निशाणा साधत आहेत. अशा परिस्थितीत ममता बॅनर्जी या मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींशी चर्चा करू शकतात, अशी अपेक्षा आहे.
ममता बॅनर्जी 7 ऑगस्ट रोजी होणाऱ्या निती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पीएम मोदी 7 ऑगस्ट रोजी निती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीचे अध्यक्षस्थानी असतील. या बैठकीत कृषी, आरोग्य आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली जाईल.
तत्पूर्वी, आपल्या दिल्ली दौऱ्यादरम्यान ममता बॅनर्जी यांनी आज पक्षाच्या खासदारांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. तृणमूल काँग्रेसने जारी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, या बैठकीत संसदेचे चालू अधिवेशन, 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीची रणनीती आणि विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी आगामी दिवसातील उपक्रमांची रूपरेषा ठरविण्यात आली.