नात्‍यात ‘पॉलीटिक्स’..! ममता बॅनर्जींनी लहान भावाशी संबंध ताेडले! नाराजीचे कारण काय?

स्‍वपन उर्फ बाबून बॅनर्जी आणि ममता बॅनर्जी ( संग्रहित छायाचित्र )
स्‍वपन उर्फ बाबून बॅनर्जी आणि ममता बॅनर्जी ( संग्रहित छायाचित्र )

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणूक स्‍वबळावर लढविण्‍याची घोषणा करणार्‍या तृणमूल काँग्रेसच्‍या अध्‍यक्षा आणि पश्‍चिम बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांना आता घरातूनच आव्‍हान मिळाले आहे. राज्‍यातील ४२ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा झाल्‍यानंतर आता स्‍वपन उर्फ बाबून बॅनर्जी हे हावडा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्‍हणून निवडणूक लढविणार असल्‍याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. दरम्‍यान, तृणमूल काँग्रेसच्या निर्णयाला विरोध केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी त्यांचे धाकटे भाऊ स्‍वपन उर्फ बाबून बॅनर्जी यांच्याशी संबंध तोडले असल्‍याचे जाहीर केले आहे.

नाराजीचे कारण काय?

स्‍वपन उर्फ बाबून बॅनर्जी हे ममता बॅनर्जी यांचे लहान बंधू आहेत. तृणमूल काँग्रेसने हावडा मतदारसंघातून प्रसून बॅनर्जी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. प्रसून बॅनर्जी हे माजी फटूबॉल खेळाडू आहेत. तसेच ते हावडा लोकसभा मतदारसंघातून सलग दोनवेळा निवडणूक जिंकले आहेत. आता पुन्‍हा एकदा तृणमूल काँग्रेसने त्‍यांना उमेदवारी दिल्‍याने ममता बॅनर्जी यांचे बंधू बाबुन यांनी नाराजी व्‍यक्‍त केली आहे.

गरज पडली अपक्ष म्‍हणून निवडणूक लढवणार : स्‍वपन बॅनर्जी

हावडा लोकसभा मतदासंघातील उमेदवार निवडीवर मी नाराज आहे. प्रसून बनर्जी हा योग्‍य पर्याय नाही. सक्षम उमेदवाराकडे डोळेझाक करण्‍यात आली आहे. प्रसून याने माझा केलेले अपमान मी विसणार नाही. मला माहिती आहे की, ममतादीदी या माझ्‍या मताशी सहमत असणार नाहीत. मात्र गरज पडली तर मी हावडा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्‍हणून निवडणूक लढवेन, असा इशाराही त्‍यांनी दिला आहे. ममतादीदी आहेत तोपर्यंत मी कधीच तृणमूल काँग्रेस सोडणार नाही. तसेच अन्‍य कोणत्‍याही राजकीय पक्षात सहभागी होणार नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

आजपासून कोणीही त्‍यांची ओळख माझा भाऊ म्हणून करणार नाही : ममता बॅनर्जी

"जसे लोक मोठे होतात तसतसा त्यांचा लोभही वाढत जातो. आमच्या कुटुंबात एकूण 32 लोक आहेत. मी त्यांना ( स्‍वपन उर्फ बाबून बॅनर्जी) कुटुंबातील सदस्य मानत नाही. आजपासून कोणीही त्यांची ओळख माझा भाऊ म्हणून करणार नाही," असेही ममता बॅनर्जी यांनी स्‍पष्‍ट केले.

लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींना भाजपचे मोठे आव्‍हान असतानाच आता घरातूनच भावानेच अपक्ष म्‍हणून निवडणूक रिंगणात उतरण्‍याचा इशारा दिला आहे. स्‍वपन उर्फ बाबून बॅनर्जी आता कोणता निर्णय घेतात? याकडे हावडा लोकसभा मतदारसंघातील तृणमूल समर्थकांसह राज्‍याचे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news