पुढारी वृत्तसेवा : राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 81.07 टक्के पाऊस झाला असून कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ते नियोजन काटेकोरपणे करण्यात यावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. राज्यात 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान केवळ 24.05 म्हणजे सरासरी 13.60 टक्के पाऊस पडला आहे. 2579 पैकी 446 महसुली भागात 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडला आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात आला.
पिक विम्याच्या अग्रिमाबाबत नियोजन
यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात 1 कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. नियमानुसार पीक विम्याचा अग्रिम, पिण्याचे पाणी, चारा उपलब्धता यासाठी काटेकोर नियोजन करावे असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. पावसाअभावी पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यास शासनाचे प्राधान्य आहे. पीक विम्याची अग्रिम रक्कम कशी देता येईल याचे चांगले नियोजन करावे. किती नुकसान झाले आहे हे अचूकरित्या काढणे, यंत्रणांमध्ये समन्वय राहील हे पाहण्याचे निर्देश त्यांनी दिले. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण महत्त्वाचे आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना कशाप्रकारे मदत करता येईल हे आम्ही पहात आहोत असेही ते म्हणाले.
यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी सादरीकरण केले. यावर्षी पाऊस महाराष्ट्रात उशिराने दाखल झाला होता. उशिरा येऊनही जून महिन्यात सरासरी 111.5 मिमी म्हणजे सरासरीच्या 53.7 टक्के पाऊस पडला. त्यानंतर जुलै महिन्यात पावसाने चांगली हजेरी लावली सरासरी पर्जन्यमानाच्या 138.7 टक्के म्हणजेच 459.0 मिमी पाऊस जुलैत पडलेला आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली असून ऑगस्ट महिन्याच्या सरासरीच्या केवळ 38.0 टक्के म्हणजे 107.9 मिमी पाऊस राज्यात पडला आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ही परिस्थिती कायम राहिली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सरासरीच्या 13.60 टक्के इतकाच पाऊस पडलेला आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा :