सौभाग्य लेणं संक्रांतीचं

सौभाग्य लेणं संक्रांतीचं

संक्रांतीची चाहूल लागल्याने काटेरी हलवा, हलव्याचे नाजूक दागिने, विविध भेटवस्तू यांनी बाजारपेठ सजली आहे. सुनेचे दागिने, बाळाचे दागिने, जावयाचे दागिने असे किती तरी प्रकार त्यामध्ये उपलब्ध आहेत. खास संक्रांतीसाठी नेसण्याच्या चंद्रकळा लक्ष वेधून घेत आहेत.
गुलाबी थंडीच्या अखेरच्या पर्वात येणारी संक्रांत म्हणजे परस्परांमधील स्नेह वाढवण्याचा एक मधुर 'इव्हेंट'च म्हणायला हवा. जीवनशैली कितीही बदलली तरी आपल्याकडे काही सण मोठ्या उत्साहाने आणि त्यातील परंपरा जोपासत साजरे केले जातात. त्यामध्ये संक्रांत हा एक महत्त्वाचा सण आहे. संक्रांत म्हटलं की, तिळगूळ, तिळाचे लाडू, तीळ लावलेल्या भाकरी, सुवासिनींचं हळदी-कुंकू, नवीन सुगडात बोरं, चिंचा, उसाची कांडं भरून त्यांची पूजा करणं, लहान मुलांचं बोरन्हाण, पतंगाच्या भरार्‍या या सगळ्या गोष्टी आठवतात; पण काटेरी हलव्याच्या उल्लेखाशिवाय संक्रांतीला परिपूर्णता येत नाही. एकमेकांना तिळगूळ देत गोड बोलण्याचं आवाहन करणारा हा सणही तेवढाच गोड आहे. नात्यांमधील गोडवा वाढवण्याचं काम तो करतो. (makar sankrant 2024 )

विविध नात्यांचे रेशमी पदर अधिक गहिरे करणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवी सून, जावई, लहान मुलं यांचं खास कौतुक केलं जातं. संक्रांतीच्या निमित्ताने नव्या सुनेला हलव्याच्या दागिन्यांनी सजवून तिचं विशेष कौतुक केलं जातं. जावयालाही हलव्याची अंगठी, फेटा आणि इतर भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. त्याचबरोबर लहान मुलांचं बोरन्हाण करून त्यांच्या अंगावर हलव्याचे आकर्षक दागिने घालण्याची पद्धत आहे. काटेरी हलवा आणि संक्रांत यांचं नातं अतूट आहे. या संक्रांतीलाही बाजारात नाना प्रकारचे हलव्याचे दागिने उपलब्ध आहेत. सुनेचे दागिने, जावयाचे दागिने, बाळाचे दागिने अशा विविध प्रकारात वर्गवारी करून हे दागिने विक्रीला ठेवल्याचं आढळतं. नव्या सुनबाईचं कौतुक करण्यासाठी हलव्याचे नाना प्रकारचे दागिने उपलब्ध आहेत. वेणीतला गजरा, तन्मणी, मेखला, मुकुट, लप्पा, कमरपट्टा, बिंदी, शाहीहार, भांगसर, चिंचपेटी, झुबे, बांगड्या, कानावरचे वेल, पाटल्या, तोडे, कुड्या, नथ, बाजुबंद, मंगळसूत्र, छल्ला अशा हलव्याच्या दागिन्यांनी सध्या बाजारपेठ सजली आहे. दागिन्यानुसार 50 ते 150 रुपये या दरामध्ये ते उपलब्ध आहेत.

याशिवाय तीळ, काकडीचं बी, कलिंगडाचं बी, वेलची, खडीसाखर, बदाम, काजू, खसखस, लवंग, पिस्ता, चारोळी, दाणे, डाळं, शेवई, बासमती, बडीशेप, पेपरमिंट अशा पदार्थांवर तयार केलेले दागिनेही मन वेधून घेतात. जावयाला द्यावयाच्या हलव्याच्या दागिन्यांमध्ये हार, फेटा, अंगठी, गुच्छ, घड्याळ, ब्रेसलेट असे प्रकार तर उपलब्ध आहेतच, पण हलव्याने सजवलेले मोबाईलही भेट म्हणून देण्यासाठी उपलब्ध आहेत. सुनेसाठी असलेल्या दागिन्यांमध्ये तीसहून अधिक प्रकार उपलब्ध आहेत. बाळासाठी श्रीकृष्ण सेट असून, त्यामध्ये बाराहून अधिक दागिन्यांचा समावेश आहे. केवळ भारतातच नव्हे, तर परदेशात स्थायिक झालेल्या भारतियांमध्येही संक्रांतीसारखे पारंपरिक सण उत्साहाने साजरे केले जातात. त्यामुळे अनेक विक्रेते आकर्षक हलव्याचे दागिने तयार करून ते परदेशीही पाठवतात. साळीच्या लाह्यांवर चितारलेली वेणी, अखंड बासमती तांदळाच्या दाण्यांवर तयार केलेला राईस पर्ल, पुणेरी फेटा, श्रीकृष्ण मुकुट असे विविध दागिने लक्ष वेधून घेत आहेत. हे दागिने तयार करताना बदलत्या फॅशनचाही विचार केलेला आढळतो. अगदी हलव्यांनी सजवलेली मनी पर्सही बाजारात पाहायला मिळते. 150 ते 200 रुपयांपर्यंत अशा पर्स बाजारात उपलब्ध आहेत. भोगी, संक्रांत आणि किंक्रात असे तीन दिवस हा सण साजरा केला जातो. पूर्वी आपल्याकडे संक्रांतीनिमित्त जावयाला हत्ती भेट देण्याची पद्धत होती. ही परंपरा कायम राखण्यासाठी हलव्याचा हत्ती आणि त्यासोबत हलव्याच्या पिशव्या दिल्या जातात.

संक्रांतीनिमित्त काळी चंद्रकळा नेसण्याची पूर्वापार प्रथा आपल्याकडे आहे. एरवी निषिद्ध मानल्या जाणार्‍या या सणाला संक्रांतीच्या निमित्ताने मात्र विशेष महत्त्व प्राप्त होतं. त्यामुळेच सध्या साड्यांच्या शोरूममध्ये काळ्या रंगाच्या साड्या दिसत आहेत. मकर संक्रांतीच्या दिवशी सुवासिनी काळी चंद्रकळा नेसून सुगडांची पूजा करतात. पारंपरिक चंद्रकळेमध्ये काळ्या साडीवर पांढर्‍या रंगाच्या काटेरी हलव्याचं नक्षीकाम केलं जातं. आधुनिक काळात हलव्याऐवजी त्यावर पांढर्‍या रंगाचं रेशीमकाम किंवा स्टोनवर्क केलं जातं.

पैठणी, वल्कलम्, साऊथ सिल्क, कांजीवरम अशा अस्सल रेशमी काळ्या साड्या शोरूममध्ये अग्रस्थानी लावलेल्या पाहायला मिळतात. तथापि, अलीकडच्या फॅशनच्या काळात केवळ काळ्या रंगाच्याच साड्या दिसतात असं नाही, तर त्यावर लाल, पांढर्‍या, केशरी, पिवळ्या अशा रंगांचाही वापर केल्याचं दिसतं. काळ्या रंगावर पांढरा रंग खुलतोच, पण लाल रंगही त्यावर खुलून दिसतो. अलीकडच्या काळात या कॉम्बिनेशनला पसंती मिळते. शिफॉन, जॉर्जेटमध्ये लाल रंगाने रेशीमकाम केलेला पदर, त्यावर लाल रंगाच्या टिकल्या किंवा खडीची बॉर्डर खुलून दिसते. या पेहरावावर इमिटेशन ज्वेलरी उठून दिसते. त्याचप्रमाणे काळ्या शिफॉन साडीवर चंदेरी किंवा तपकिरी रंगाचं नक्षीकामही खुलतं. जॉर्जेटच्या काळ्या साडीवर फिकट पिवळ्या आणि पांढर्‍या रंगाच्या रेशमाने भरलेली फुलं साडीची नजाकत वाढवतात. कटवर्क असणार्‍या पदरावर फुलांसोबत नाजूक नक्षीकाम असेल तर साडीच्या सौंदर्याला आणि अर्थातच ती परिधान करणार्‍या स्त्रीच्या सौंदर्यालाही बहार येते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news