Cash for Query Case : महुआ मोईत्रांबाबत एथिक्स कमिटीचा अहवाल मंगळवारी लोकसभेत मांडला जाणार

Cash for Query Case : महुआ मोईत्रांबाबत एथिक्स कमिटीचा अहवाल मंगळवारी लोकसभेत मांडला जाणार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Cash for Query Case : कॅश फॉर क्वेरी प्रकरणात नैतिक आचरण समितीचा अहवाल मंगळवारी (५ डिसेंबर) लोकसभेत मांडला जाणार आहे. लोकसभेच्या कार्यक्रम पत्रिकेत उल्लेख असूनही सभागृहात झालेल्या गोंधळामुळे हा अहवाल सोमवारी (४ डिसेंबर) मांडण्यात आला नाही. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना अपात्र ठरविण्याची शिफारस यात करण्यात आली आहे. मात्र, विरोधी पक्षांनी या कारवाईला कडाडून विरोध केला आहे.

महुआ मोईत्रा यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ नये अशी मागणी संसदीय समित्यांच्या नियमांचा हवाला देत काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी केली होती. यानंतर, तृणमूल काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनीही या कारवाईला विरोध व्यक्त केला आहे. त्यापार्श्वभूमीवर विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या आजच्या संसदीय रणनिती बैठकीमध्येही हा मुद्दा उपस्थित झाला. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दालनात झालेल्या विरोधकांच्या बैठकीत नैतिक आचरण समितीचा अहवाल फुटल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्याचे ठरले. त्यानंतर संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभमध्ये गोंधळाने कामकाजाला सुरवात झाली.

महुआ मोईत्रांच्या मुद्द्यावरून आज सभागृहात विरोधी पक्ष आक्रमक दिसला. चर्चेविना अहवाल मांडला जाऊ नये अशी मागणी विरोधकांची होती. लोकसभेच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये नैतिक आचरण समितीचा अहवाल समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर मांडतील असा उल्लेख होता. यामुळे चवताळलेल्या विरोधकांनी जोरदार गोंधळामुळे प्रश्नोत्तराचा तास होऊ शकला नाही आणि पिठासीन अधिकाऱ्यांना कामकाज तहकूब करावे लागले. मात्र, दुपारी बाराला सभागृह सुरू झाल्यानंतर शासकीय कागदपत्रे सभापटलावर मांडण्यात आली त्यामध्ये नैतिक आचरण समितीच्या अहवाल सादरीकरणाचा उल्लेख झाला नाही. यामुळे विरोधी बाकांवरून आरएसपीचे एन. के. प्रेमचंद्रन आणि काँग्रेसचे के. सुरेश हे खासदार महुआ मोईत्रांच्या अहवालाबाबत विचारणा करताना दिसले.

खासदार महुआ मोईत्रा या देखील सभागृहात उपस्थित होत्या. मात्र, अखेरपर्यंत अहवाल सभागृहात सादर झाला नाही. दरम्यान, संसद भवनाच्या परिसरात समितीचे अध्यक्ष विजय सोनकर यांनी हा अहवाल सादर न झाल्याबद्दल भाष्य करण्यास नकार दिला. मात्र मिळालेल्या माहितीनुसार हा अहवाल उद्या सभागृहात येऊ शकतो. तर, महुआ मोईत्रा यांनीही यावर भाष्य करण्याचे टाळले. अहवाल सभागृहात मांडल्यानंतर त्यावर बोलता येईल अशी टिप्पणी त्यांनी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news