Mahayuti Seat Sharing : महायुती जागावाटपाचा पेच आज सुटणार

Mahayuti Seat Sharing : महायुती जागावाटपाचा पेच आज सुटणार

नवी दिल्ली, पुढरी वृत्तसेवा : महायुतीच्या जागावाटपाचा पेच सोमवारी (दि. 11) सुटण्याची दाट शक्यता आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक याच दिवशी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह बिहारमधील जागावाटप अंतिम होईल, अशी चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत होईल. या बैठकीत महाराष्ट्रातील जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे.

दोन दिवसांपूर्वी अमित शहा यांच्यासोबत महाराष्ट्रातील नेत्यांच्या बैठकीत केलेल्या सूचनेनुसार महायुतीमधील जागावाटपावर मुंबईत पुन्हा चर्चा झाल्यानंतर हे नेते दिल्लीच्या बैठकीसाठी उपस्थित राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. उद्या, राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह महायुतीतील नेते रवाना होतील. त्यामुळे भाजपच्या दुसर्‍या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे जाहीर होऊ शकतात.

सक्षम उमेदवार देतो, त्यांना कमळ चिन्हावर लढवा : शिंदे, अजित पवारांनी दिला प्लॅन महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गटासोबत 13 खासदार आहेत. त्यांना एवढ्या जागा सोडायला भाजप तयार नाही. हीच भूमिका अजित पवार गटाबाबतही आहे. शहा यांचा आक्रमक पवित्रा पाहून या मित्रपक्षांनी त्यांना एक प्रस्ताव सुचवला आहे. त्यानुसार काही जागांवर आमच्या पक्षाकडून सक्षम उमेदवार देतो. तुम्ही त्यांना कमळाच्या चिन्हावर लढवा. त्यामुळे महायुतीतील ऐक्य कायम राहील, असे म्हटले आहे. हा प्रस्तावही भाजपने स्वीकारल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पेच सुटायला मदत होणार आहे.

तिन्ही पक्षांचा सन्मान होईल : पवार

अजित पवार म्हणाले बैठकीत तिन्ही पक्षांचा सन्मान होईल असे जागावाटप होईल. सोमवारी मंत्रिमंडळाची बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत दिल्लीला जाणार आहे, असे ते म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news