महाशिवरात्री विशेष : पर्यटक आणि भाविकांना खुणावतेय कोकणेरचे जटाशंकर मंदिर!

महाशिवरात्री विशेष : पर्यटक आणि भाविकांना खुणावतेय कोकणेरचे जटाशंकर मंदिर!
Published on
Updated on

पालघर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर सूर्या नदी काठावर वसलेल्या कोकणेर गावात पेशवेकालीन पुरातन जटाशंकर मंदिर आणि नैसर्गिक गरम पाण्याच्या झर्‍यांसाठी प्रसिद्ध आहे. स्वयंभू शिवमंदिर असल्याने श्रावणातील सर्व सोमवार, मकर संक्रांत आणि महाशिवरात्रीला जटाशंकर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. शनिवारी 18 रोजी हा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होत आहे त्यानिमित्त छोटासा केलेला लेखप्रपंच….

पालघर ते मनोर हमरस्त्यावरील चहाडे आदिवासी नाका येथून पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या पुरातन काळातील दगडी बांधकाम असलेल्या पेशवेकालीन मंदिराचा जीर्णोद्धार पालघर – नवली, मासवण आणि कोकणेरच्या ग्रामस्थांनी मिळून मिती वैशाख शुद्ध 3 चंद्रवासरेसा 1972 शके 1837 रोजी करण्यात आला आहे. त्यानंतर गेल्या दहा वर्षांपूर्वी मंदिराचे सुशोभीकरण आणि विस्तारीकरण करण्यात आले.

मंदिराच्या मागच्या बाजूस उत्तरेला साईबाबा मंदिर आणि गगनगिरी महाराजांचा सप्तश्रृंगी मठही आहे. मठाची स्थापना 1983 साली करण्यात आली आहे. जटाशंकर मंदिराच्या मागच्या बाजूच्या भिंतींना लागून भग्नावस्थेतील मूर्त्या आणि शिलालेख आहेत.

जटाशंकर मंदिराच्या पूर्वेला पन्नास मीटर अंतराववरून वाहणार्‍या सूर्या नदीच्या काठावर नैसर्गिक गरम पाण्याचे झरे असलेली आणि सूर्या नदीच्या पात्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने बुडालेली कुंडे अस्तिवात आहेत. कुंडाच्या भिंतीपासून तीन फूट वर पाण्याची पातळी असल्याने कुंडे बुडालेल्या अवस्थेत आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी मासवण पुलालगतच्या कोल्हापूर टाइपच्या बंधार्‍याच्या झडपा काढल्यानंतर नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी होऊन कुंडे उघडी पडतात. त्यामुळे मे महिन्यापासून ते दिवाळीपर्यंतच्या कालावधीत या कुंडातील गरम पाण्यात आंघोळीचा लाभ घेता येतो. पावसाळ्यात सूर्या नदीला पूर आल्यास कुंडे पाण्यासाठी जात असतात.

कोकणेर गावच्या हद्दीतील गरम पाण्याच्या नैसर्गिक झर्‍यांचा इतिहास पाहता, शंभर वर्षांपूर्वी सूर्या नदीकाठच्या भागात गरम पाण्याचे झरे आढळून आले होते. त्याकाळी ग्रामस्थांनी दगड बांधकाम करून गरम पाण्याचा वापर सुरू केला होता. परंतु, सूर्या नदीला आलेल्या पुरात नदीकाठ खचल्याने कुंडे पाण्यात गेली होती. अलीकडच्या काळात आमदार निधीतून नदीकाठच्या भागात कुंडांचे बांधकाम करण्यात आले. परंतु, सूर्या नदीवरील बंधार्‍यामुळे नदीपात्राची पाणी पातळी वाढल्याने कुंडातील गरम पाण्याचा लाभ भाविकांना घेता येत नसल्याची खंत ग्रामस्थांनी बोलून दाखवली आहे.

मासवण पुलालगतच्या बंधार्‍याची वरच्या बाजूची एक झडप कायमस्वरूपी अथवा मकर संक्रांतीपर्यंत काढून ठेवल्यास सूर्या नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. वर्षाचे बारा महिने गरम पाण्याच्या कुंडांचा वापर करता यावा, यासाठी ग्रामसभेचा ठराव घेऊन प्रशासनाकडे मागणी केली जाणार असल्याची माहिती कोकणेरच्या सरपंच मालिनी इभाड यांनी दिली.

 संकलन – मंगेश तावडे, नविद शेख (पालघर)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news