दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी: बोर्डाकडून परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेला पहिला पेपर

Maharashtra state education board announced final exam time table of SSC and HSC pune
Maharashtra state education board announced final exam time table of SSC and HSC pune

पुणे, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी – मार्च 2023 मध्ये घेण्यात येणार्‍या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यावर सूचना, आक्षेप मागविण्यात आले. त्यानंतर आता राज्य मंडळाने अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत होईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.

राज्य मंडळातर्फे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात दहावी तसेच बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात येते. परंतु मार्च 2020 मध्ये कोरोना आल्यानंतर पुढील दोन वर्षे संभाव्य वेळापत्रकच जाहीर करण्यात आले नव्हते. परंतु, यंदा मात्र 19 सप्टेंबरला संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानंतर संबंधित वेळापत्रकावर 15 दिवसांमध्ये लेखी सूचना मागविण्यात आल्या होत्या. या सूचनांचा विचार करून अंतीम वेळापत्रक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

ओक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअ‍ॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news