नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आयोजित इयत्ता दहावीची परीक्षा शुक्रवारपासून (दि.१) सुरु होत आहे. जिल्ह्यात २ लाख ५७९ विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. बारावीप्रमाणे दहावीच्या परिक्षार्थींना अतिरिक्त दहा मिनिटांची वेळ मिळणार आहे. शुक्रवारी पहिल्या दिवशी मराठीसह इतर प्रथम भाषा विषयांची लेखी परीक्षा होणार आहे.
शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार लेखी परीक्षांना शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. प्रमुख विषयांच्या परीक्षा सकाळ सत्रात घेतल्या जाणार असून, काही विषयांची परीक्षा दुपारच्या सत्रात होणार आहे. सकाळ सत्रातील परीक्षेची वेळ अकरा वाजेची असून, सकाळी साडेदहाला विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहाणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने परीक्षेचे वेळापत्रक तयार केले आहे. या परीक्षेदरम्यान बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवलेला आहे. ही परीक्षा २६ मार्चपर्यंत चालणार आहे.
जिल्हानिहाय विद्यार्थी संख्या
नाशिक ९३,९०९
धुळे २८,६४५
जळगाव ५७,०५८
नंदूरबार २०,९६७
एकूण २,००,५७९