पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात सध्या जनरल डायरचे राज्य आहे. एक नाही तीन जनरल डायर आहेत. एक मुख्य जनरल डायर आहे आणि दुसरे दोन डेप्युटी जनरल डायर राज्यात सत्तेत आहेत. यांच्या विचारांनीच सध्या राज्य सुरू आहे, त्यामुळे मंत्रालयात बसलेला जनरल डायर कोण? हे ओळखले पाहिजे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर (Maharashtra Politics) केली आहे.
माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, जालन्यात झालेल्या लाठीहल्यात पोलिसांचा दोष नाही. आंदोलन चिरडण्याचे आदेश मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, असेही ते म्हणाले. जालन्यातील मराठा आंदोलनाचा चेहरा बनलेले मनोज जरांगे- पाटील यांच्याशी फडणवीस यांनी संपर्क साधत, चर्चेसाठी बोलावले आहे. यावर राऊत यांनी फडणवीस आणि त्यांच्या सरकारवर टीका करत 'कुठल्या तोंडाने मुख्यमंत्री जालन्यात (Maharashtra Politics) जाणार असा सवाल केला आहे.
स्वार्थांसाठी हे सरकार घटनादुरूस्त्या करते. सरकारने मराठा दुर्बलांसाठी घटना दुरूस्ती करावी. सरकारने आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावे. समाजात न्याय व्हावा आणि समाजातील आर्थिक, दुर्बल घटकांना न्याय मिळावा हीच आमची मागणी आहे, असेही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. (Maharashtra Politics)