शरद पवार रिचार्ज; मनसुबे डिस्चार्ज

शरद पवार रिचार्ज; मनसुबे डिस्चार्ज
Published on
Updated on

सांगली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राजीनामा देण्याची केलेली घोषणा आणि तो मागे घेण्याचा घेतलेल्या निर्णयाच्या दरम्यान अनेकांची स्वप्ने रंगली आणि भंगलीही. राजकारणात कधीही, काहीही होऊ शकते, याचा पुन्हा प्रत्यय आला. राज्याच्या राजकीय पटलावरील या महत्त्वाच्या घडामोडींचे पडसाद अर्थातच जिल्ह्यातही उमटले. निर्णय मागे घेत शरद पवार पुन्हा नेहमीप्रमाणेच नव्या जोमाने कामाला लागले. त्यामुळे अनेकांचे राजकीय मनसुबे मनातच राहिले.

शरद पवार यांनी निवृत्ती जाहीर केली. अनेकांना ही अचानक केलेला निर्णय वाटला. या घोषणेच्या अगोदर माजी मंत्री अजित पवार यांची भाजपशी वाढलेली जवळीक बातम्यांमधून झळकत होती. ते भाजपच्या गोटात जातील, अशी अनेकांची अटकळ होती. तसे झाल्यास माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे राजकीय भवितव्य काय असेल? ते कोणता निर्णय घेणार? याची उत्सुकता काही दिवस राहिली. ते काँग्रेसमध्ये जाणार, अशी शक्यता व्यक्त होऊ लागली. त्यांचे निकटवर्तीय, काँग्रेसचे जिल्ह्यातील काही नेते, राष्ष्ट्रवादीची काही मंडळी यांना ते काँग्रेसमध्ये जातील, असे वाटत होते. तसे ते खासगीत बोलतही होते.

पवार यांची निवृत्तीची घोषणा, अजित पवार यांचे भाजपप्रेम, जयंत पाटील काँग्रेसच्या वाटेवर या राजकीय नेपथ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरलेली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता, चिंतेचे वातावरण तर मरगळलेल्या काँग्रेसची बॅटरी रिचार्ज झालेली होती. जयंत पाटील यांचे काँग्रेसमध्ये स्वागतच आहे, अशी प्रतिक्रिया नेते, पदाधिकारी खासगीत व्यक्त करत होते. त्यांच्या येण्याने काँग्रेस कशी बळकट होईल, यासारखे आडाखेही बांधले जात होते. जयंत पाटील यांच्यावर काँग्रेस संस्कृतीचेच संस्कार आहेत. त्यामुळे काँग्रेस त्यांना नवीन नाही; पण असे होणार नव्हते, सध्या झालेही नाही. परिणामी जिल्हा काँग्रेसच्या प्रफुल्लित झालेल्या आशेवर पाणी पडले. हा सारा जर-तर च्या तर्काचा खेळ झाला तरी राजकारणात तो अपरिहार्य असतो. एका रात्रीत चित्र होत्याचे नव्हते झालेले जनतेने अनेक वेळेला पाहिलेले आहे. मुद्दा काय होता तर जयंत पाटील काँग्रेसवासी झालेच असते तर जिल्ह्याचा राजकीय पटच बदलून गेला असता.

शरद पवार राजीनाम्याच्या निर्णयावर ठामच राहिले असते तर जयंत पाटील यांना कोणत्या तरी निणर्याप्रत येणे क्रमप्राप्त झाले असते. राष्ट्रवादीतील त्यांची वाटचाल खडतर झाली असती. याचे कारण ते आणि अजित पवार दोघेही महत्त्वाकांक्षी. दोघांनाही मुख्यमंत्री व्हावयाचे आहे. अजित पवार यांनी ते अनेक वेळेला बोलून दाखवले आहे. जयंत पाटील तसेच बोलले पाहिजेत, असे नाही. त्यांची इच्छा लपून राहिलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या एकाच म्यानात या दोन तलवारी कशा काय राहणार? असाही तर्क लढवला गेला.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या छावणीत हा मनसुब्यांचा खेळ सुरू असताना जिल्ह्यातील भाजपच्या गोटात खुशीची लहर होती. राज्यात, केंद्रात पाचही बोटे तुपात असलेला भाजपला आणखी एक वजनदार नेता मिळणार, अशी शक्यता व्यक्त होत होती. त्यांच्या सांगाती असणारे आणखी काही नेतेही येतील, अशी अटकळ होती. भाजप मंडळी जाहीर बोलत नसले तर चर्चा तर होतेच.

शरद पवार निवृत्त होणार, अजित पवार भाजपमध्ये येणार, मग काय संपूर्ण जिल्ह्याच भाजपचा आणि राज्याचे चित्र बदलायलाही मदत होणार, असे मनसुबे होते. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत भाजप आमदारांची मांदियाळी वाढणार इत्यादी इत्यादी चित्रे रंगवली गेली. भाजप कार्यकर्त्यांच्या या आशेवरही पाणी पडले, असेच
सध्या तरी म्हणावे लागेल. आता सर्वांचे लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे. त्यावर सरकारचे भवितव्य अवलंबून आहे, अशी लोकभावना झालेली आहे. निर्णय लागेल, राजकारणाची दिशा बदलेल, ठरेल. तूर्त तरी शरद
पवार रिचार्ज झाले आणि कैकांचे राजकीय मनसुबे डिस्चार्ज झाले.

काँग्रेसकडे मागे वळून पाहताना…

जिल्ह्यात सहकार चळवळीच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी काँग्रेस रुजवली, वाढवली. त्यामुळे दादांना मानणारा फार मोठा वर्ग जिल्ह्यात आजही आहे. त्यांच्या नंतर जनतेचा पाठिंबा असणारा असा लोकनेता पाहायला मिळत नाही. इंग्रजीत ज्याला मास लीडर म्हणतात. आर. आर. पाटील मास लीडर होते, जयंत पाटील उत्कृष्ट संघटक आहेत. आर. आर. यांना शरद पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये घेतले तसे जयंत पाटील यांनाही. काँग्रेस पुन्हा पिछाडीवर. जिल्ह्याचे नेतृत्व राज्य पातळीवर करेल, असा नेता काँग्रेसमध्ये कोण? हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला. पतंगराव कदम आणि मदन पाटील यांनी राजकीय पोकळी काही प्रमाणात भरून काढलीही; पण त्याला जिल्हा, राज्य स्तरावरची राजकीय झळाळी नाही प्राप्त झाली. लोकनेता, जनतेचा नेता या बिरुदावलीची शान, मान, रुबाब काही औरच असतो. तात्पर्य, जिल्हा काँग्रेसपुढे अनेक स्तरावर आव्हाने आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news