Lok Sabha Election 2024 : इलेक्शन आलं… महिला आठवल्या

Lok Sabha Election 2024 : इलेक्शन आलं… महिला आठवल्या
Published on
Updated on

सांगली : एरवी घरकामाला जुंपलेल्या महिलांचेही 'अच्छे दिन' येतात. त्याचा प्रत्यय सध्या येतो आहे. खासदारकीचं इलेक्शन आलं आहे आणि झाडून सार्‍या राजकीय पक्षांना महिलांची आठवण झाली आहे. मार्च महिना महिलांसाठी खूप काही देणारा ठरला. यंदाचा महिला दिन खूप वेगळ्या पध्दतीने साजरा झाला. अजूनही साजरा होतोय हे विशेष. त्यानिमित्त खेळ, स्पर्धा, लकी ड्रॉ, आरोग्य शिबिरे सगळ्याच पातळीवर विशेष लक्ष देऊन यंत्रणा राबवण्यात आल्या. हे सारे राजकारणासाठी, महिलांसाठी सार्‍या स्पर्धा. त्यांच्यासाठी खेळ, बक्षिसे त्यांचे कौतूक हे सारेच राजकारण. निवडणूक दारात आल्यावर घरात बसवलेल्या महिलांचा अचानकच इतका पुळका का आला आहे हे समजण्याइतक्या महिला सजग, सावध आणि हुशार झाल्या आहेत, हे मात्र नक्की.

लोकशाहीत मतासाठी किंमत मोजावी लागते हे दोन्ही अर्थाने स्पष्ट आहे. उमेदवाराला आणि मतदारालाही. उमेदवार मतदारांना काही ना काही भेट वस्तू किंवा इतर तत्सम गोष्टी देऊन त्या बदल्यात मते मागतात, तर आपली कामे साध्य करून देण्याच्या बोलीवर मतदार आपली मते त्यांना देतात. म्हणजे हा सारा देवाण-घेवाणीचा मामला आहे. त्यातून महिला वर्ग तरी कसा वाचू शकेल? सार्‍याच राजकीय पक्षांनी आता ही महिला शक्ती आपल्याकडं खेचायचे नवनवीन फंडे आणले आहेत.

महिलांसाठी कार्यक्रम नंतर आखले गेले आधी मतदार नोंदणी आणि सर्व्हेसाठी झाडून सगळ्या शिक्षिका आणि अंगणवाडी शिक्षिका, मदतनिसांना कामाला लावण्यात आलं. बचतगट, अंगणवाडी संघटना, शिक्षक संघटना, डॉक्टर, वकील संघटना अशा महिलांच्या संघटनांच तयार आहेत. त्या स्वत:च्या विचाराने कार्यरत आहेत. आत्मनिर्भर आहेत. म्हणून त्यांच्या मताला आणखी किंमत आहे. त्या दृष्टीनं महिला मतदारांसाठी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करून मतांची जुळवाजुळव सुरू आहे. यंदा मार्च महिना त्यादृष्टीनं खूप धावपळीचा ठरला. महिला उमेदवार 33 टक्के आरक्षणाइतक्याच मिळतील परंतु मतदार म्हणून त्यांचा टक्का पूर्णत: फायद्याचा व्हावा यादृष्टीने सगळ्याच पक्षांनी केलेली धडपड महिला वर्गाला नक्कीच अस्तित्वाची जाणिव करून देणारी आहे.

हजार पुरूषांमागे 958 महिला मतदार

सांगली जिल्ह्यात विशेषत: वाळवा, शिराळा या सधन तालुक्यात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण हजार मुलांमागे 900 असे प्रमाण आहे. त्यामानाने महिला मतदारांचे प्रमाण चांगले आहे. हजार पुरूषांमागे 958 महिला मतदार आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडे अधिक लक्ष दिले जात आहे. प्रत्येक निवडणुकीत पुरूष मतदारांना आकर्षित करण्याचे अनेक फंडे अंमलात आणले जात होते, आता मात्र चित्र बदलले आहे. 'वहिनीसाहेबांसाठी कायपण' अशी संकल्पना राबवून महिलांना काही ना काही भेट देण्याची युक्ती शोधली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news