तब्बल पाच वेळा लोकसभा निवडणूक जिंकलेले भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष, विद्यमान रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध काँग्रेसने माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांना उमेदवारी दिली आहे. रावसाहेब दानवे मूळचे जालना जिल्ह्यातील भोकरदनचे, तर डॉ. काळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्याचे. यापूर्वी काँग्रेसने ज्यांना जालन्यातून दोनवेळा उमेदवारी दिली ते विलास औताडेदेखील संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्याचे. त्यामुळे काँग्रेसला दानवे यांच्याविरुद्ध जालना जिल्ह्यातील उमेदवार आतापर्यंत मिळालेला नाही, हे स्पष्ट आहे.
जालना, बदनापूर, भोकरदन हे जालना जिल्ह्यातील तीन आणि फुलंब्री, सिल्लोड व पैठण हे संभाजीनगर जिल्ह्यातील तीन अशा सहा तालुक्यांचा जालना लोकसभा मतदारसंघ. यापैकी जालना विधानसभा मतदार संघात सध्या काँग्रेसचे कैलास गोरंट्याल, बदनापूरला भाजपचे नारायण कुचे, भोकरदनला रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे, फुलंब्रीत भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे, सिल्लोडला शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) अब्दुल सत्तार आणि पैठणमध्ये शिवसेनेेचे संदीपान भुमरे हे विद्यमान आमदार आहेत. म्हणजे या मतदार संघात भाजपचे तीन, शिवसेना शिंदे गटाचे दोन आणि काँग्रेसचा एक आमदार आहे. या चित्रावरून भाजपचे पारडे जड दिसते. तथापि, दानवे पाच टर्मपासून खासदार असल्यामुळे सत्ताविरोधी (अॅन्टी-इन्कम्बन्सी) लाटेचा त्यांना फटका बसू शकतो. शिवाय, डॉ. काळे माजी आमदार आहेत. जालना जिल्ह्यातील संपर्क वाढविण्याचे प्रयत्न त्यांनी वर्षभरापासून सुरू केले. पक्षाच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांची जमवाजमव केली आहे. त्याचा लाभ त्यांना मिळू शकेल. मात्र, जालना जिल्ह्याच्या राजकारणावर दानवे यांची मजबूत पकड आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या फुटीचा फायदाही त्यांना मिळू शकेल.
या मतदार संघातील वर्चस्वावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये नेहमीच संघर्ष पहावयास मिळतो. 1989 मध्ये भाजपचे पुंडलिक हरी दानवे विजयी झाले होते. त्यानंतर लगेच, म्हणजे 1991मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे अंकुशराव टोपे विजयी झाले. 1996 पासून या मतदार संघावर भाजपने ताबा मिळविला. 1996 आणि 1998च्या निवडणुकीत भाजपचे उत्तमसिंग पवार लोकसभेवर निवडून गेले. 1999 पासून म्हणजे गेल्या 25 वर्षांपासून रावसाहेब दानवे येथे खासदार आहेत.
वंचित बहुजन आघाडीने 2019 मध्ये डॉ. शरदचंद्र वानखेडे यांना उमेदवारी दिली होती. ते 77 हजार मते घेऊन तिसर्या स्थानावर राहिले. डॉ. वानखेडे यांनीच 2014 मध्येही बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना 67 हजार मते मिळाली होती. मात्र, दानवे यांना या दोन्ही निवडणुकांमध्ये अनुक्रमे 3.32 लाख आणि 2 लाख इतके मताधिक्य मिळाले होते. यावेळी संभाजीनगरचे प्रभाकर बकले 'वंचित'चे उमेदवार आहेत.