Lok Sabha Election 2024 | जळगाव- पवार, गावित, खडसे, भामरे, पाडवी यांची प्रतिष्ठा पणाला

Lok Sabha Election 2024 | जळगाव- पवार, गावित, खडसे, भामरे, पाडवी यांची प्रतिष्ठा पणाला

पहिल्याच पक्षांतरात लोकसभेचे तिकीट, विजय आणि मंत्रिपद असा त्रिवेणी संगम साधण्याचा योग दिंडोरीतील डॉ. भारती पवार यांना आला. 2014 ची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलेल्या आणि पराभूत झालेल्या डॉ. पवार या कळवण विधानसभा क्षेत्राचे आठ वेळा प्रतिनिधित्व करणार्‍या दिवंगत ए. टी. पवार यांच्या स्नुषा आहेत. काळाची पावले ओळखून डॉ. भारती पवार 2019 च्या निवडणुकीदरम्यान भाजपच्या कमळावर स्वार झाल्या आणि विक्रमी मतांनी निवडून आल्या. सुशिक्षित आदिवासी चेहरा, उच्चशिक्षित पार्श्वभूमी आणि मितभाषी असल्याचा लाभ त्यांना झाला. मोदी मंत्रिमंडळात त्यांची अनपेक्षितपणे वर्णी लागली. त्यांच्याकडे आरोग्य राज्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली. यावेळी पक्षाने पुन्हा त्यांना मैदानात उतरवलेे आहे. त्यांची प्रमुख लढत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे यांच्याशी होणार आहे. शेजारच्या धुळे मतदार संघात भाजपने डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी दिली आहे. (Lok Sabha Election 2024)

डॉ. भामरे यांच्या मातोश्री गोजराबाई 1972 मध्ये साक्री मतदार संघात आमदार होत्या, तर वडील रामराव पाटील (भामरे) देखील राजकारणात सक्रिय होते. मातोश्रींच्या पावलावर पाऊल ठेवत डॉ. भामरे यांनी काही वर्षांपूर्वी धुळे विधानसभा मतदार संघात शिवसेनेकडून नशीब आजमावले होते. मात्र, त्यांना यशाने हुलकावणी दिली होती. 2014 आणि 2019 मध्ये ते धुळे लोकसभा मतदार संघातून निवडून गेले. पहिल्या खेपेला त्यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्रिपद देण्यात आले होते. यंदा विजयाच्या हॅट्ट्रिकचे स्वप्न उराशी बाळगताना त्यांना महाविकास आघाडी उमेदवाराचे आव्हान असणार आहे.

नंदुरबार लोकसभा मतदार संघात भाजपच्या डॉ. हिना गावित विरुद्ध काँग्रेसचे अ‍ॅड. गोवाल पाडवी असे द्वंद्व रंगणार आहे. विशेष म्हणजे दोघांना राजकीय वारसा आहे. डॉ. हिना यांचे वडील डॉ. विजयकुमार गावित अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात मंत्रिपदावर राहिले आहेत. डॉ. हिना यांनी 2014 आणि 2019 अशा दोन्ही लढती जिंकल्याने पक्षश्रेष्ठींनी तिसर्‍यांदा त्यांच्यावर विश्वास दर्शवला आहे. अ‍ॅड. पाडवी हे ज्येष्ठ काँग्रेस नेते के. सी. पाडवी यांचे सुपुत्र आहेत. के. सी. यांना तब्बल सात वेळा आमदारकीचा टिळा लागला आहे. लोकसभेत मात्र ते आजवर मतदारांची पसंती होऊ शकलेले नाहीत. यंदा त्यांच्या सुपुत्राला पक्षाने मैदानात उतरवले आहे. गावित आणि पाडवी या दोन बड्या आदिवासी घराण्यांतील येथील लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रात सातत्याने चर्चेत राहिलेले राजकीय घराणे म्हणजे खडसे हे होय. या घराण्यातील रक्षा खडसे रावेर मतदारसंघ तिसर्‍यांदा काबीज करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. वस्तुत: भाजप आणि खडसे जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू मानल्या जातात. एकनाथ खडसे यांनी भाजपची पाळेमुळे भक्कम केली. सहा वेळा आमदार, विरोधी पक्षनेते, ज्येष्ठ मंत्री असा प्रवास केलेल्या नाथाभाऊंनी भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. सध्या ते राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटासोबत आहेत. म्हणूनच रक्षा यांना भाजप उमेदवारी देतो की नाही, अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र, पक्षाने ती संधी दिल्याने रक्षा खडसे तिसर्‍यांदा भाजपचे कमळ फुलवण्यासाठी नशीब आजमावत आहेत. (Lok Sabha Election 2024)

परंपरागत मतदार निर्णायक…

राजकीय वारसा असलेल्या उमेदवारांची निवड करताना त्यांच्या घराण्याप्रती बांधील असलेल्या परंपरागत मतदारांचा प्राधान्याने विचार केला जातो. लौकिकार्थाने असे उमेदवार वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी वेळ घेत नाहीत, हा लाभ पक्षाला होतोच. शिवाय समाजात स्वत:ची थोड्या-बहुत प्रमाणातील व्होट बँक उमेदवारासाठी बलस्थानाचा भाग ठरतो. काँग्रेसला या प्रमेयाचा दशकानुदशके फायदा झाला. आता भाजपने काँग्रेसशी नाळ जुळलेल्या अनेक घराण्यांना कवेत घेऊन राजकीय इप्सितप्राप्तीचा धडाका लावल्याची बाब गेल्या दशकात समोर आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news