मुंबई : पुढारी वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या तातडीने बोलावलेल्या बैठकीला गुरुवारी 8 आमदारांनी दांडी मारली. या आमदारांनी अनुपस्थितीसाठी विविध कारणे दिली असली तरी यांच्यापैकी काही आमदार भविष्यात अशोक चव्हाण यांच्याप्रमाणे पक्ष सोडून जाऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. ( Maharashtra Politics )
संबंधित बातम्या
चव्हाण यांच्यापाठोपाठ मराठवाड्यातील विलासराव देशमुखांचे वारसही भाजपात जाणार अशी चर्चा आहे. मात्र आज बैठकीला माजी मंत्री अमित देशमुख हे हजर नसले तरी त्यांचे बंधू व आमदार धीरज देशमुख हे हजर होते.
चव्हाणांनी काँग्रेस सोडल्यानंतर आमदारांच्या होणार्या पहिल्याच बैठकीत किती आमदार दांडी मारतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशोक चव्हाण यांचे समर्थक आणि नांदेड जिल्ह्यातील आमदार माधवराव जवळकर आणि मोहन हंबर्डे यांनी अपेक्षेप्रमाणे या बैठकीला दांडी मारली. मात्र नांदेड जिल्ह्यातील जितेश अंतापूरकर यांनी या बैठकीला हजेरी लावली.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र व माजी मंत्री अमित देशमुख, झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके, माजी मंत्री के सी पाडवी, जयश्री जाधव, संग्राम थोपटे यांनीही या बैठकीला हजर नव्हते. यापैकी प्रत्येकाने लग्नसमारंभ, आजापणामुळे गैरहजर राहत असल्याची कारणे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांना दिली आहेत.
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्याने त्यांच्यासोबत काँग्रेसचे 15 आमदार जातील, असे बोलले जात आहे.
झिशान सिद्दीकी यांनी बुधवारी रात्री चंद्रकांत हंडोरे यांच्या राज्यसभेच्या अर्जावर सही केली होती. बैठकीला काही कारणामुळे हजर राहणे शक्य नाही, असे त्यांनी आधीच सांगितले होते. सुलभा खोडके आणि जयश्री जाधव यांच्या घरी लग्नसमारंभ असल्याचे त्यांनी आधीच कळविले होते. तर संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे आजारी असल्याचे सांगितले जात आहे. तसेच के सी पाडवी यांनीही आजारपणाचे कारण दिले.
राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे भव्य स्मारक लातूर येथे उभारले जात आहे. त्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी अमित देशमुख हे या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यांचे बंधू धीरज देशमुख बैठकीला उपस्थित होते. अशोक चव्हाण यांचे समर्थक माधवराव जवळकर आणि मोहन हंबर्डे हे दोन्ही नांदेडचे आमदार घरात लग्नसमारंभ असल्याचे कारण सांगून गैरहजर होते,तर नांदेडचे तिसरे आमदार जितेश अंतापूरकर हे या बैठकीला उपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.पटोले हे अंतापूरकर यांना काँग्रेस सोडू नका, तुम्हाला भवितव्य आहे,असे समजावून सांगत आहेत. ( Maharashtra Politics )