Maharashtra NCP Crisis : दोघात तिसरा आल्याने शिंदे गटाचा सत्तेतील वाटा घटणार

Maharashtra NCP Crisis : दोघात तिसरा आल्याने शिंदे गटाचा सत्तेतील वाटा घटणार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे आपल्या समर्थकांना घेऊन महायुतीत सामील झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची कोंडी झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तार होणार आणि त्यामध्ये आपली वर्णी लागणार म्हणून शिंदे गटातील अनेक आमदार वाट पाहत होते. मात्र, दोघात तिसरा भिडू आल्याने शिंदे गट आणि भाजपलाही सत्तेचा आपला वाटा राष्ट्रवादीला द्यावा लागणार आहे.

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत गेले. त्यांनी राज्यात परत येताच मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पावसाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि त्यात आपला समावेश होईल, असे दावेदार आमदार सांगत होते. मात्र, रविवारी राज्यात पुन्हा एकदा भूकंप होऊन अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आणखी आठजणांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. राष्ट्रवादीला आणखी चार ते पाच मंत्रिपदे मिळणार आहेत. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपच्या वाट्याला आता प्रत्येकी चारच मंत्रिपदे येणार आहेत. त्यात कोणाला संधी द्यायची, असा पेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे निर्माण होण्याची शक्यता आहे.

सरकारमध्ये शिंदे गटाच्या 40 आमदारांना जास्त निधी मिळत असून, भाजपच्या आमदारांवर अन्याय होत असल्याच्या गेल्या वर्षभर तक्रारी होत्या; पण विरोधी पक्षात बसण्यापेक्षा जी सत्ता मिळाली ती स्वीकारा, असे त्यांना देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या वरिष्ठ मंत्र्यांकडून सांगण्यात येत होते. कारण, शिंदे गटाच्या आमदारांना दुखवणे परवडणारे नव्हते. मात्र, आता अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्याने शिंदे गटाच्या आमदारांचे महत्त्व काही प्रमाणात कमी करणे भाजपला शक्य होईल.

यड्रावकर, बाबर यांचे काय?

शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले, प्रवक्ते आमदार संजय शिरसाट, माजी राज्यमंत्री बच्चू कडू, अनिल बाबर, चिमणराव पाटील, संजय रायमूलकर असे अनेक मंत्रिपदाचे दावेदार आहेत. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही राज्यमंत्रिपद सोडून शिंदेंना साथ दिली होती. आता या सर्वांचा समावेश मंत्रिमंडळात होणे कठीण आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news