मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवाजी पार्कवर यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा उद्धव ठाकरे घेणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हा प्रश्न कायम असतानाच आता दसर्याच्याच मुहूर्तावर शिवाजी पार्कला सभा घ्या, अशी विनंती मनसेप्रमुख राज ठाकरे यांना आम्ही करणार आहोत, असे मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितले.
ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, मराठी माणसाचा विचार पुढे गेला पाहिजे. यासाठी आम्ही महाराष्ट्र सैनिक राज ठाकरे यांचे विचार दसर्याच्या मुहूर्तावर ऐकण्यासाठी उत्सुक आहोत.
दरम्यान, दसर्याला शिवाजी पार्कवर आमचाच मेळावा होणार, याबाबत कोणताही संभ्रम नाही. संभ्रम निर्माण करणार्यांनी खुशाल तसे प्रयत्न करावेत. पण यात बदल होणार नाही. महापालिका परवानगी देईल अथवा न देईल, आम्हाला काही फरक पडत नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी प्रतिस्पर्धी शिंदे गटाला ठणकावले आहे.