महाराष्ट्र केसरीस पै. संजय पाटील यांच्या स्मरणार्थ १ लाख

महाराष्ट्र केसरीस पै. संजय पाटील यांच्या स्मरणार्थ १ लाख

कराड; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, जिल्हा तालीम संघ आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्‍पर्धेतील महाराष्ट्र केसरी किताब विजेत्या मल्लास महाराष्ट्र केसरी स्व. संजय पाटील आटकेकर यांच्या स्मरणार्थ 1 लाखाचे बक्षीस दिले जाणार आहे. याची घोषणा महाराष्ट्र चॅम्पियन व स्व. संजय पाटील यांचे बंधू धनाजी पाटील यांनी केली आहे.

सन 1994 साली अकोला येथे झालेल्या स्पर्धेत आटके गावचे सुपूत्र स्व. संजय पाटील यांनी महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकून सातारा जिल्हय़ाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता. यावर्षीची स्पर्धा सातारच्या मातीत होत आहे, याचा मनापासून आनंद होत आहे. स्व. संजय पाटील यांच्या पश्चात त्यांच्या कुटुबीयांकडून जिल्ह्यातील मल्लांना नेहमीच प्रोत्साहन देत गोरगरीब मल्लांना मदत करण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे.

लाल मातीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आणि स्व. पै. संजय पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी महाराष्ट्र केसरी किताब पटकावून दिमाखदार कामगिरी करणाऱ्या मल्लाला प्रोत्साहन देण्यासाठी एक लाख रूपये देणार असल्याचे पै. धनाजी पाटील यांनी सांगितले.

logo
Pudhari News
pudhari.news