बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर (Maharashtra-Karnataka border issue) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज नियोजित बैठक रद्द झाली असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता महाराष्ट्र व कर्नाटकच्या खासदारांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत सीमाप्रश्नी सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. (Maharashtra-Karnataka border issue)
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या बेताल वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. सीमाभागात महाराष्ट्राच्या वाहनांवर आणि मराठी भाषिकांवर हल्ले करण्यात येत आहेत. या मुद्द्यावर संसदेच्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनी आवाज उठवला होता. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय खासदारांची बैठक बोलाविली होती. पण गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकालामुळे ही बैठक होऊ शकली नाही. तरीही आज शिवसेनेच्या खासदाराने संसदेत शून्य प्रहरात सीमाप्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला होता. (Maharashtra-Karnataka border issue)
त्याची दखल घेत अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील खासदारांची बैठक बोलाविली आहे. या बैठकीत सीमावादावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.