पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम घाटाचे सौंदर्य काय आणि किती वर्णावे. पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले विशाळगड हे निसर्ग संपन्न असलेले पर्यटन स्थळ होय. अणुस्कुरा खिंड आणि आंबा घाट हे कोल्हापूरच्या बाजारपेठेला कोकण बंदरांशी जोडणारे ठिकाण. (Maharashtra Day Special Explore Sahyadri) अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार 'विशाळगड' आहे. नावाप्रमाणेच विशाल असणारा हा गड सर करण्यासाठी अनेक ट्रेकर्स, पर्यटक आणि भाविक इथे येतात. राम मंदिर, मलिक रेहान दर्गा याठिकाणे असंख्य हिंदू-मुस्लिम भाविक हजेरी लावतात. खासकरून कर्नाटकातून इथे येणारी भाविकांची संख्या खूप आहे. आम्ही तुम्हाला या लेखामध्ये पावनखिंड, विशाळगड, पालेश्वर धबधबा, मानोली धरण, कोकण दर्शन अशा असंख्य पर्यटनस्थळांची माहिती देणार आहोत. कोल्हापुरातून विशाळगडला जाणार असाल एका दिवसात ही स्थळे तुम्हाला पाहता येतील. पण थोडी विश्रांती हवी असल्यास यासाठी दोन दिवसांचा वेळ लागेल. दुचाकी-चारचाकीने ही ट्रीप अविस्मरणीय ठरेल. (Maharashtra Day Special Explore Sahyadri)
कोल्हापुरातून विशाळगडला जात असाल तर वाटेत पैजारवाडी हे गाव लागते. कासवाच्या आकारातील चिले महाराजांचे खूप मोठे मंदिर येथील आकर्षण आहे.
हे मंदिर पाहण्यासारखे आहे. या मार्गाने पुढे जाताना अनेक भाविक-पर्यटक याठिकाणी आवर्जुन भेट देतातचं.
गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दमछाक होऊ नये म्हणून गडावर चढताना स्थानिक लोकांची थंडगार पेय असलेली छोटी दुकाने आहेत. वृद्ध लोकांसाठी पालखीप्रमाणे डोली उपलब्ध आहे. विशाळगडावर पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे स्वत: पाण्याची सोय करणे, हे कधीही उत्तम.
विशाळगाडवर राहण्यासाठी छोट्या-छोट्या खोल्या भाड्याने मिळतात. पण पाण्याअभावी गडावर अनेक पर्यटक राहत नाहीत. त्याऐवजी जाताना अनेक हॉटेल्स उपलब्ध आहेत, त्याठिकाणी राहणे पसंत करतात.
१) पावनखिंड मार्गे – बांबवडे-मलकापूर-पांढरपाणी-भात तळी-गजापूर-पावनखिंड लागते. येथून काही किलोमीटर अंतरावर विशाळगडला जाता येते.
२) आंबा वाघझरा मार्गे – बांबवडे- शाहूवाडी-मलकापूर-आंबा-विशाळगडला जाता येते. मलकापुरातून विशाळगडला थेट रस्ता आहे.
खोकलाईदेवीचे मंदिर, विशाळगड किल्ला, राम मंदिर, अमृतेश्वर महादेव मंदिर, हजरत मलिक रेहान दर्गा (२ दर्गा आहेत), मुंडा दरवाजा, कोकण दरवाजा, अहिल्याबाई समाधी मंदिर, वाघजाई मंदिरे, वीर बाजीप्रभू देशपांडे समाधी, शिवकालीन लहान पूल, मारुती मंदिर, पाण्याच्या टाक्या, गडावर चार दरवाजा, नरसोबा मंदिर, तलाव, टकमक कडा, बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांची समाधी, दोन विहिरी (चौकोनी आणि अर्धचंद्राकार विहिर), पंत अमात्य यांच्या जुन्या राजवाड्याचे अवशेष.
जुन्या दर्गाजवळ एक मोठे पठार असून याठिकाणी सह्याद्रीच्या डोंगररांगा जवळून पाहता येतात. विशालकाय दरी आणि भिरभिरणारा वारा सर्वकाही सुखावह ठरणारे असते.
याठिकाणी हत्ती अन् गायब झालेली वरात दगडी स्वरुपात डोंगरामध्ये वसलेली दिसते.
गजापुरातून विशाळगडला जाताना कोकणी पद्धतीची कौलारु घरे, कुक्कुटपालन. शेळीपालन करणारे शेतकरी, कोकणी पद्धतीची नऊवारी साडी नेसलेल्या महिला, लाल माती अन् सभोवताली सह्याद्रीच्या डोंगररांगा असा निसर्गाचा पसारा दृष्टीत भरणारा आहे.
याठिकाणाला एकदा का होईना, नक्की भेट द्या.
गडावर मात्र स्वत: जेवण बनवावे लागेल. प्यायचे पाणीदेखील याठिकाणी पैसे देऊन विकत घ्यावे लागते. उन्हाळ्यात रानमेवा भरपूर प्रमाणात उपलब्ध असते.
काळी मैना, जांभूळ, काजुचे बोंड, फणस, चिकन्या, नेरली, जरदाळू, शिवाय तमालपत्री याठिकाणी भरपूर प्रमाणात सापडते. (तमालपत्रीची पाने मसाले भात करताना वापरली जातात)
मलकापुरातून ३ कि.मी. आतमध्ये हे धरण आणि धबधबा आहे. येथे पावसाळ्यात असंख्य पर्यटक पालेश्वर धबधब्याचा आनंद लुटतात.
कोल्हापूर-बांबवडे-मलकापूर बाजारपेठ. बाजारपेठेतून डावीकडे एक रस्ता गेला आहे जो पांढरेपाणी – पावनखिंड मार्गे विशाळगडला जातो. पांढरेपाणीच्या अलिकडे उजव्या बाजूला एक छोटा कच्चा रस्ता गेला आहे, जो पालेश्वर धरण आणि धब्याधब्याकडे जातो.
पालेश्वरमधून बाहेर पडल्यानंतर पावनखिंडीकडे जाता येते. पांढरपाणी अशी त्याची मुख्यत: ओळख आहे. पावनखिंडीचे मुख्य प्रवेशद्वार एखाद्या किल्ल्याच्या तटबंदीप्रमाणे वर्तुळाकार दिसते. भगवा ध्वज इथे फडकताना दिसतो. इथे पार्किंगची सोय आहे.
पुढे गेल्यानंतर मोठा बुरुज दिसतो. या बुरुजावर सहजपणे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पुढे गेल्यानंतर इतिहासाची माहिती देणारे फलक इथे दिसतात.
बाजीप्रभूंना वीरमरण प्राप्त झाले, त्यामुळे ही जागा पवित्र झाली. अशा या पावनखिंडीत ढाल-तलवारी प्रतिक असलेले बाजीप्रभूंचे स्मृतीस्थान आहे.
लागूनचं मोठा धबधबा पावसाळ्यात प्रवाहित होतो. तरुणांची इथे प्रचंड गर्दी असते.
हा धबधबा नयनरम्य असून धबधब्याच्या वरून प्रवाहित होणाऱ्या पाण्यात बसून आनंद लुटता येतो. इतरवेळी धबधबा आटला की, या खिंडीत उतरण्याची सोय आहे.
अनेक ट्रेकर्स खिंडीतून ट्रेक करण्यासाठी याठिकाणी येत असतात.
उन्हाळ्यात य़ाठिकाणी स्थानिक लोक मसाले ताक, कोकम , सरबत, कोकम फळे, करवंद, जांभूळ, चिकन्या, कलिंगड, चहाची विक्री करतात. तर पावसाळ्यात गरमागरम मक्याचे कणीस, मॅगी, मसाले चहा, भजी विकतात. किंवा तुम्ही घरचे जेवण आणून याठिकाणी बसून जेवलात तरी चालते. येथे ऐसपैस जागा आहे.
'कोकण दर्शन' या नावाने सह्याद्री सनसेट पॉईंट आहे. असंख्य पर्यटक याठिकाणी सुर्यास्त पाहण्यासाठी गाड्या थांबवून उपस्थिती लावतात. कोकणचे दर्शन याठिकाणाहून होते. सह्याद्रीच्या एका मागोमाग अनेक विशाल रांगा जवळून पाहता येतात.
दुसरा मार्ग आहे – आंबा घाटातून. आंबा गावातून पुढे गेल्यानंतर वाघझरा हे ठिकाण विश्रांतीसाठी उत्तम ठिकाण आहे. (कोकणात जाणाऱ्यांसाठी आंबा घाटाची सुरुवात याठिकाणापासून होते) वाघझरा येथे पर्यटकांना विश्रांतीसाठी सोय केली आहे. वाघझऱ्यातून खाली उतरण्यासाठी पायऱ्या केल्या आहेत, जिथे जंगलाची सुरुवात होते. इथे एक गोड्या पाण्याची विहिर बांधण्यात आली आहे. पूर्वी याठिकाणी खुले तळे होते.
आंब्यातून पुढे आल्यानंतर मानोलीचे धरण दृष्टीस पडते. या धरणापर्यंत गाडीने जाता येते. पावसाळ्यात हे धरण भरल्यानंतर खळखळ वाहणारे पाणी, सभोवतालचा सुंदर परिसर अनुभवता येतो. मानोली धरणाच्या साचलेल्या पाण्यात बोटिंग रायडिंगची सोयदेखील आहे. मानोलीतून पुढे गेल्यानंतर एक रस्ता विशाळगडाकडे गेला आहे.
ट्रीपचा अवधी वाढवला तर बर्कीचा धबधबा देखील पाहता येईल. या धबधब्याला जाण्यासाठी जंगलातून पायवाट असून थोडे चालावे लागते. कोकणात जाणाऱ्यांसाठी पावनखिंडीतून अणुस्कुरा घाटा मार्गे जाता येईल. या मार्गावरून राजापूरला जाण्यासाठी रस्ता आहे.
वरील सर्व ठिकाणी १२ ही महिने जाऊ शकता. उन्हाळ्यात मे महिन्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही या ठिकाणी कुटुंबासह जाऊ शकता.
पावसाळ्यात याठिकाणी धो-धो पाऊस पडतो. हा पाऊस जर अनुभवायचा असेल तर नक्की जा! पण, पावसाळ्यानंतर याठिकाणी जाणे स्वर्गाहून कमी नाहीये. हिरव्यागार धरतीने ओढलेली धुक्याची चादर, पडणाऱ्या हलक्या सरी, हवेतील गारवा आणि ओलेचिंब झाडांवरून पडणारे टपटप पाणी, भिजलेल्या रस्त्यावरून प्रवास अनुभवणे हे भाग्यात असावे लागते. हिवाळ्यात विशाळगड पाहणे, डोळ्याचे पारणे फेडणारे ठरते.
तुम्ही जर ट्रेकर्स असाल तर तुम्हाला पन्हाळा – पावनखिंड ट्रेकिंग करता येते.
आंबा फाट्यावर अनेक दुकाने आणि हॉटेल्स उपलब्ध आहेत. येथून तुम्ही कोरडा खाऊ विकत घेऊ शकता अथवा अनेक चांगले हॉटेल्स असल्यामुळे याठिकाणी जेवणदेखील करू शकता.