Maharashtra By-Election : भाजप नेत्यांसारखाच ‘मविआ’च्या नेत्यांनी उमदेपणा दाखवावा : राज ठाकरे

Maharashtra By-Election
Maharashtra By-Election

पुढारी ऑनलाईन डेस्क : "आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. जो उमदेपणा भाजपने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वाना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा." असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्राच्‍या माध्‍यमातून केले आहे. त्यांनी हे पत्र आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे. (Maharashtra By-Election )

कसबा–चिंचवाड पोट निवडणूका होत आहेत.  महाविकास आघाडी आणि भाजपचं कसबा आणि चिंचवड पोट निवडणूक लढायचं ठरलं आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रयत्न करत आहेत की, कसबा-चिंचवड पोट निवडणूक बिनविरोध व्हावी. त्याचबरोबर राज ठाकरे यांनीही पत्र लिहीत बिनविरोध निवडणुकीसाठी आवाहन केले आहे. त्‍यांनी पत्राव्‍दारे केलेले आवाहन पुढीलप्रमाणे

Maharashtra By-Election : पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा

सस्नेह जय महाराष्ट्र !

महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांच नुकतंच दुःखद निधन झालं. ह्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. मी अगदी सुरुवातीपासून ह्या मताचा आहे की, जेंव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेंव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं एका उमद्या राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला दिलेली श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानभूती दाखवेलच असं नाही.

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके ह्यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यावेळेस मी श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आव्हान केलं होतं. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी निवडणूक बिनविरोध होऊ दिली.

आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वाना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा.

आपला नम्र, राज ठाकरे

पोटनिवडणुका होणारच : राऊत

 मुख्यमंत्री यांनी आवाहन केले असेल आणि राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे पत्र लिहले असेल तरीही पोटनिवडणुका होतील.आम्ही महाविकास आघाडी एकसंघपणेनिवडणूक लढवेल आणि कसबा–चिंचवाड पोट निवडणूका जिंकेलच. असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना केले आहे.आता राज ठाकरेंच्या आवाहनाला राजकीय पक्ष कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news