Pravin Darekar : मला अटक करण्याचा खटाटोप सुरू, प्रविण दरेकरांचा आरोप

Pravin Darekar : मला अटक करण्याचा खटाटोप सुरू, प्रविण दरेकरांचा आरोप
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बोगस मजूर प्रकरणी (bogus labor case) भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पुन्हा एकदा पोलिस चौकशीला हजर राहिले. पोलिसांनी दरेकरांना (Pravin Darekar) चौकशीसाठी समन्स बजावला होता. त्यानंतर दरेकर हजर झाले. यावेळी पोलिस स्टेशनबाहेर मोठ्या प्रमाणात भाजपच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. चौकशीनंतर दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनावर निशाणा साधला.

दरेकर (Pravin Darekar) म्हणाले की, राज्य सरकार सूडबुद्धीने काम करत असून मला अटक करण्याचा खटाटोप सुरू आहे. यात पोलिस दबावाखाली काम करत आहेत. महाविकास आघाडी सरकारकडून माझी छळवणूक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी पोलिस चौकशीला संपूर्ण सहकार्य करत आहे, असे त्यांनी सांगितले.

मुंबै बँक (Mumbai bank) बोगस मजूर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रवीण दरेकर यांची 4 एप्रिल रोजी रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये चौकशी झाली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावला होता. त्यानुसार दरेकर आज चौकशीसाठी हजर झाले.

तत्पूर्वी दरेकरांनी (Pravin Darekar) ट्विटरवरून महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले की, जो काही आरोप आमच्यावर करण्यात आला त्या संदर्भात मी अब्रु नुकसानीचा दावा करणार आहे. तशा अर्थाची नोटीस मी काँग्रेस नेते भाई जगताप यांना पाठविली असून नाना पटोले आणि धनंजय राम कृष्ण शिंदे यांनाही पाठवणार आहे. मुंबै बँकेचा नफा १५ कोटी असताना आपण २ हजार कोटी घोटाळ्याचा आरोप करत आहात, तेव्हा केवळ आपल्या प्रसिद्धीसाठी एखाद्या संस्थेला असे बदनाम करणे योग्य नाही, असं ही त्यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण…

प्रविण दरेकर यांनी मुंबै बँक निवडणुकीसाठी मजूर संस्थे अंतर्गत अर्ज दाखल केला होता. यापूर्वीही दरेकर मजूर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच मुंबै बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. आताही त्यांनी प्रतिज्ञा मंजूर संस्थेमार्फत मुंबै बँक निवडणुकीसाठी अर्ज भरला. मात्र दरेकर मजूर नसल्याचा आक्षेप घेत त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने दरेकर यांना सहकार विभागाने नोटीस बजावली होती. या नोटिशीत आपण मजूर आहात की नाही? अशी विचारणा दरेकर यांना करण्यात आली होती. तसेच दरेकर यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या कुटुंबाची स्थावर मालमत्ता 2 कोटी 9 लाख रुपये असल्याचे दाखवले होते. दुसरीकडे विरोधी पक्षनेते म्हणून दरेकर यांना 2 लाख 50 हजार मानधन मिळत आहे. त्यामुळे आपण प्रथमदर्शनी मजूर असल्याचे दिसून येत नसल्याचेही नोटिशीत नमुद करण्यात आले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news