अटल सेतूवरील पहिले प्रवासी कोल्हापूरचे मदन पवार

अटल सेतूवरील पहिले प्रवासी कोल्हापूरचे मदन पवार

रायगड, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उद्घाटन केलेल्या देशातील सर्वात लांब अशा अटल सेतू या सागरी पुलावरून प्रवास करणारे पहिले प्रवासी ठरण्याचा मान कोल्हापूरच्या मदन पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना मिळाला. मध्यरात्री त्यांचे व कुटुंबाचे प्रकल्प अधिकार्‍यांकडून स्वागत करण्यात आले व त्यांचा सत्कारही करण्यात आला.

अटल सेतूचे उद्घाटन झाल्यावर सर्वसामान्य जनतेसाठी शुक्रवार, दि. 12 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून (13 जानेवारीपासून) टोल घेऊन अटल सेतू वाहतुकीस खुला करण्यात आला. मध्यरात्री 12 वाजता हा पूल सर्वांसाठी खुला करण्यात आला तेव्हा टोल देऊन सर्वप्रथम निघणार्‍या कारमधील प्रवाशांचा प्रकल्प अधिकार्‍यांनी सत्कार केला. अटल सेतूवरून पहिला प्रवास करण्याचा मान मिळवला तो कोल्हापूरवासी व सध्या बेलापूर येथे राहाणारे निवृत्त कस्टम अधिकारी मदन पवार व त्यांच्या कुटुंबीयांनी.

अटलसेतूचे प्रकल्प व्यवस्थापक कैलास गणात्रा आणि अभियंता अमित पाठक यांनी पवार कुटुंंबाचे यावेळी भेटवस्तू देऊन शानदार स्वागत केले. मध्यरात्री बारा वाजून सहा मिनिटांनी मदन पवार याची चिर्ले एन्ड येथील गव्हाण टोल प्लाझा येथून मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी त्यांच्या कार समोर श्रीफळ वाढवून त्यांना शुभेच्छा दिल्या. कोल्हापुरात मीराभक्ती रेसिडेन्सी येथे राहाणार्‍या पवार यांनी सांगितले की, मी कुणी व्हीआयपी नाही. एक सर्वसामान्य माणूस आहे. अटलसेतूचा पहिला वापर खर्‍या अर्थाने सर्वसामान्य माणसाने केला. तेथे आमचा सत्कार केल्याने आम्ही भारावून गेलो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news