नगर, जामखेड तालुक्यात लंपीचा प्रकोप सुरूच!

नगर, जामखेड तालुक्यात लंपीचा प्रकोप सुरूच!
Published on
Updated on

वाळकी/जामखेड, पुढारी वृत्तसेवा: नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा, मठपिंप्री गावांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या परिसरातील तीन जनावरांना लंपी स्कीन आजाराची बाधा झाली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी व त्यांचे सहकारी त्याच प्रमाणे खासगी डॉक्टरांनी लंपी स्कीन आजारापासून जनावरांचा बचाव करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. राळेगण, गुणवडी, वडगाव तांदळी, गुंडेगाव परिसरातील जनावरांचे लसीकरण वेगात सुरू आहे.

शेतकरी, दुग्ध व्यवसायिकांंमध्ये भीतीचे वातावरण आहे. पशुवैद्यकीय अधिकरी डॉ. अनिल गडाख, डॉ. संजय महांडुळे, नितीन क्षीरसागर, रामदास आचार्य, मुकुंद उंडे, बापू भापकर, संदीप कुलांगे, शिवराज भापकर, जनार्दन डोरपाले, सिद्धार्थ जगताप, सीताराम देविकर, मच्छिंद्र वाघमोडे, आकाश ठोंबरे, प्रदीप पठारे, आनंद शिंदे यांनी लंपी बाधित गावांसह परिसरातील गावांमध्ये प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना व जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.

जामखेड तालुक्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असून, तालुका प्रशासन सतर्क झाले आहे. तालुक्यातील आठ गावांमधून या आजाराचे नमुने गोळा करून पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यापैकी जवळा, मोहरी, लोणी, गुरेवाडी येथील चार जनावरांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील 2020च्या पशुधन जनगणेनुसार 87 गावांमधील गाई व म्हशी 75 हजार 450 इतकी आहेत. यापैकी 20 हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी दिली. तालुक्यात आतापर्यंत सात 'एपी' सेंटर तयार केले असून, एकूण 26 गावांमध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या सर्व गावांतील जनावरांची काळजी घेण्याबाबत पशुपालकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. ग्रामपंचायतच्या मदतीने संबंधित गावांमध्ये कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली आहे. जामखेड तालुक्यात जनावरांमध्ये लंपी आजार वेगाने पसरत असून, जनावरांचे बाजारही बंद करण्यात आले आहेत. आतापर्यंत 20 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

हा आजार तत्काळ उपचाराने बरा होणारा असून, परिसरात तातडीने लसीकरण सुरू केले आहे. आजाराची लक्षणे आढळल्यास तातडीने पशुवैद्यकीय अधिकारी किंवा पशुसंवर्धन विभागाशी संपर्क करावा. आजाराबाबत शेतकर्‍यांनी भीती बाळगू नये.
-बाळासाहेब हराळ, माजी सदस्य, जि.प.

डास, गोचिड, माशांमुळे लम्पी रोगाचा प्रसार होतो. गोठ्याबाहेर फवारणी करून परिसर निर्जंतुकीकरण करावा. तत्काळ उपाय करून लम्पी रोगाचा प्रभाव रोखता येतो. यामुळे शेतकरी व पशु पालकांनी घाबरून जाऊ नये.
-डॉ. अनिल गडाख, पशुवैद्यकीय अधिकारी, गुंडेगाव

आमदार पवारांनी दिल्या एक लाख लस

लम्पी रोगाचा सामना करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी एक लाख लस उपलब्ध करून दिल्या आहेत. मागील दीड वर्षापूर्वी लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यावेळेसही मतदार संघासाठी पन्नास हजार लस मोफत दिल्या होत्या. आताही शासनाकडे लसीचा तुटवडा असताना व्यक्तिगत प्रयत्न करून बारामती ग्रो व कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने एक लाख जनावरांना लस मोफत देत आहोत, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news