अपरिग्रहाची महावीरवाणी

भगवान महावीर
भगवान महावीर

भगवान महावीर हे जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर आजही त्यांच्या समृद्ध आणि सभ्यक कल्याणकारी विचारांमुळे मार्गदर्शक ठरतात. एखादा विचारप्रवाह सहस्रावधी वर्षांच्या कालप्रवाहात केवळ प्राचीन कालीन असल्याने नव्हे, तर त्याची व्यावहारिक व सामाजिक उपयुक्तता टिकून असल्यानेच तो महत्त्वपूर्ण ठरतो.

अहिंसा हाच परमोच्च धर्म यावर पूर्ण विश्वास ठेवून आपली जीवनशैली त्या तत्त्वानुसार काटेकोरपणे ठेवणारे महावीर आणि त्यांचे अनुयायी हे सध्याच्या विविध सामाजिक, राजकीय तसेच मानसिक प्रश्नांचे उत्तर शोधणार्‍यांना मार्गदर्शक ठरतात. जैन धर्मियांच्या विचारांचे आणि आचारांचे महत्त्वाचे जीवनसूत्र हे अपरिग्रह असून, त्याचा स्वीकार केल्यास आपली जीवनशैली अधिक समृद्ध बनू शकते. यासाठी अपरिग्रह समजून घेऊन आपण किमानवादी जीवन पद्धती विकसित करू शकतो. प्रत्येकास सुख -समाधान हवे असे वाटणे हे नैसर्गिक असून, त्यासाठीच प्रयत्न करतो. परंतु, सुख आणि समाधानाचा संबंध वस्तूंची उपलब्धता, त्यांचा संग्रहाशी पूर्णतः जोडल्याने नेमके सुख तर बाजूला राहते आणि अपूर्णता वाढीस लागते. यातून सतत वस्तूंच्या उपलब्धतेवर वापरावर, संग्रहावर सर्व लक्ष केंद्रित केल्याने हव्यास जन्मास येतो. वस्तू आपणासाठी आहे की, आपण वस्तूसाठी आहे, असा प्रश्न पडतो. अनेकांच्या घरी वस्तूसाठा एवढा असतो की, तो एखाद्या गोदामात राहत असल्यासारखे वाटते. ही भोगलालसा वस्तूंवर मालकी हक्क प्रस्थापित करणारी पुढे व्यक्तीवरही हक्क प्रस्थापित करू लागते. यातून पती हा घरचा स्वामी म्हणजे मालक होतो.

पिता, पुत्र, गुरू, शिष्य अशी स्वामीत्व मालिका चालत राहते. अशा परिग्रहातून, संकलनातून खरोखर समाधान मिळते का? याचे उत्तर शोधल्यास नकार व निराशा येते. आपल्याजवळील वस्तू दुसरा काढून घेईल, आपले महत्त्व कमी होईल या भीतीतून संग्रह वाढतो. आपण जेव्हा कोणतेही साधन गरजेपेक्षा, आवश्यकतेपेक्षा अधिक घेतो तेव्हा ती मूलभूत स्वरूपात हिंसाच असते. दुसर्‍याचेही आपणास हवे व त्यासाठी युद्ध करण्याचीही तयारी ही मानवजातीची महाशोकांतिका गेल्या 5 हजार वर्षांच्या इतिहासात झालेली 4 हजार युद्धे स्पष्ट करतात. काही युद्ध तर जगात शांतता नांदावी, यासाठी झालेली आहेत. सर्वांच्या गरजा पूर्ण होतील एवढी साधन सामग्री उपलब्ध असली तरी हव्यासाने निर्माण होणारी विषमता कोणत्याही एका व्यक्तीचे अथवा समूहाचे समाधान व कल्याण करू शकणार नाही, हे लक्षात आल्यानंतर अपरिग्रह हेच त्याचे अंतिम उत्तर राहते.

1960 नंतरच्या कालखंडात अमेरिका आणि नंतर इतर देशांत किमानवादाची चळवळ सुरू झाली. याचा मूळ पाया हा अपरिग्रहाच्या मूलतत्त्वात आहे. जैन तत्त्वज्ञानात मोक्ष प्राप्तीचे व अंतिम केवलज्ञानाचे साधन म्हणून या अपरिग्रहाच्या तत्त्वाकडे पाहिले जाते. अपरिग्रहाची खरी सुरुवात हा परिग्रहाचा फोलपणा समजल्यानंतरच येतो व या जाणीवेतूनच किमानवादी जीवन शैली एका जागतिक चळवळीच्या स्वरूपात गेल्या 6 दशकांपासून विस्तारत आहे. संगीत, शिल्प, वास्तूकला, जीवनपद्धती अशा बहुआयामी पद्धतीने ही चळवळ एक मानवी इतिहासाच्या प्रगतीतील कल्याणकारी पाऊल ठरते. महावीरांच्या विचारांचा वारसा असलेली ही पद्धत कशी स्वीकारावी याबाबत माहिती महाजालावर अनेकांनी दिली असून, त्यांचे कार्यसमूहदेखील कार्यरत आहेत. किमानवादी जीवनशैली ही वस्तूंचा साधनांचा सभ्यक वापर करण्यावर भर देते. अनावश्यक, वापराधीन वस्तू म्हणजे मोहक कचराच असतो. तो काढून टाकणे म्हणजे आपण केव्हातरी एकदा घरसफाई करतो त्याप्रमाणे असले तरी मूलभूत फरक हा वस्तूवरील ताबा सोडणे हा आहे.

आपण केवळ नंतर लागतील म्हणून आता संग्रह करतो यात पैसा व वेळ दोन्ही वाया घालवतो. त्यापेक्षा अशा वस्तू गरजूंना देणे ही अधिक महत्त्वाचे व समाधानकारक असते. गुंतागुंत कमी करणे ही जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे. असंख्य वस्तूंनी कपाटे व घर भरलेले असते. त्यातील 20 टक्के वस्तूच वापरात असतात. त्यातून मोहाचा हात निघत नाही. वस्तूंची आपल्यावर मालकी केव्हा प्रस्थापित झाली व आपण वस्तूंचे मोबाईल गुलाम झाले हे लक्षातच येत नाही. किमानवादाचा किंवा अपरिग्रहाचा संकल्प यातून आपली सुटका करतो. अपरिग्रहाची किंवा किमानवादाची जीवनशैली अत्यंत लवचिक व सोयीची असली तरी निर्धार महत्त्वाचा असतो.

मला किती कपडे हवेत आणि गेल्या 6 महिन्यांत एकवेळही न वापरलेले कपडे किंवा चपला, बूट गरजूला देण्याचा संकल्प करून, त्याचा अनावश्यक संग्रह घटवता येईल. वस्तू खरेदी करताना 30 : 30 चा नियम वापरता येईल. नवीन वस्तू घेण्यापूर्वी 30 मिनिटे पूर्व विचार करणे व शक्य असल्यास ती खरेदी 30 दिवस पुढे ढकलावी. खरे तर मॉलमध्ये गेल्यावर 50 रुपयांची वस्तू घेण्यास गेल्यावर 5 हजारांची खरेदी सहज होते. यामागे आपली परिग्रह मानसिकता कार्यरत असते. ज्या वस्तू 5 वर्षांपेक्षा अधिक काळ विनावापर आहेत, त्या काढून टाकणे, दर महिन्याला एकदा तरी वस्तू मुक्तता दिवस पाळणे, अशा अनेक उपक्रमांची यादी देता येईल. महत्त्वाचे म्हणजे काही सन्माननिय व्यक्ती सोडल्या, तर सर्वजण डिजिटल व्यसनी झालो आहेत. हा डिजिटल परिग्रह कमी केल्यास व्यक्तिगत संवाद व सुसंवाद वाढेल. निदान 1 तास तरी यापासून दूर राहिलो तरी मोठे यश संपादले, असे म्हणावे लागेल. आनंदी देशाच्या यादीमध्ये असणारे स्वीडन, डेन्मार्क, नॉर्वे, जर्मनी, जपान, कॅनडा, अमेरिका हे देश किमानवादाचा मोठ्या प्रमाणात स्वीकार करणारे ठरले आहेत.

अपरिग्रह हा प्रवास परिग्रहाच्या उलट दिशेने चालणारा असून, आनंद वस्तूमध्ये त्यांच्या संग्रहात नसतो तर गरजेपुरते त्यांचा वापर करण्यात असतो. ही अतिसंग्रहाची हव्यासी मानसिकता आपणासोबत इतरांना दु:खी करते. सामूहिक स्तरावर विस्तारवाद, युद्ध हे याच विकृतीचे प्रतिबिंब आहे. बाजार केंद्रित उत्पादन व्यवस्था प्रथम हव्यासाची मागणी तयार करते व त्यासाठी सर्वकाही अशी वर्तनमालिका सुरू करते. बाह्यवस्तूपासून मुक्तता किमानवादातून येईल; पण ते ही अपुरे आहे. येथे आता महावीरांची आंतरिक प्रवासाची, आत्मशोधाची दिशा महत्त्वाची ठरते. केवळ वस्तू सोडणे ही नकारात्मक प्रक्रिया आहे. आत्मबोध हे महत्त्वाचे असते. खरे तर आंतरिक रिकामेपणा भरण्याचा प्रयत्न आपण बाह्य वस्तू संग्रहातून करतो. यातून बाहेर पडण्यासाठी प्रथम वस्तूंचा संम्यकबोध आवश्यक आहे. वस्तूसाठी मी नाही व माझा शोध मलाच घ्यावा लागेल, हा मार्ग महावीरांनी दिला म्हणून त्यांच्या जन्मकल्याणकाचे आनंदोत्सव साजरा करताना मी महावीर होण्याचा प्रवास सुरू करणे अपरिग्रहातून शक्य होईल, असे वाटते.

– प्रा. डॉ. विजय ककडे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news