पुणे : लांबूनच तपासणी, औषधाच्या बाटल्यांची व्यवस्था नाही; पालिकेच्या दवाखान्यांमधील जळजळीत वास्तव

पुणे : लांबूनच तपासणी, औषधाच्या बाटल्यांची व्यवस्था नाही; पालिकेच्या दवाखान्यांमधील जळजळीत वास्तव
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा  : दवाखाना बंद होण्याच्या अर्ध्या तासापूर्वीच केसपेपरची खिडकी बंद… जेवणाची सुटी संपल्यावर रुग्णांना उशिरा प्रवेश… औषधांसाठी बाहेरून बाटल्या, डब्या आणण्यास सांगणे… स्वच्छतागृहच गायब अन् डॉक्टरांनी हात न लावताच केलेली तपासणी..! असे अजब चित्र शहरातील महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये गुरुवारी पाहायला मिळाले. दै. 'पुढारी'च्या प्रतिनिधींनी हडपसर, धनकवडी, येरवडा, कात्रज, वडगाव, कर्वेनगर अशा विविध भागांमधील महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये ही परिस्थिती अनुभवली.

महापालिकेतर्फे पुण्यात कमला नेहरू आणि डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालय ही दोन रुग्णालये, 41 दवाखाने आणि 15 प्रसूतिगृहे, अशी आरोग्यव्यवस्था उभारण्यात आली आहे. सामान्य नागरिकांना अत्यंत माफक दरात उपचार मिळावेत, यासाठी दवाखान्यांमध्ये प्राथमिक तपासणी, उपचार यांवर भर दिला जातो. मात्र, वेळेचे पालन न होणे, आजूबाजूच्या परिसरातील अस्वच्छता, रुग्णांशी बोलण्याची पध्दत, अशा अनेक त्रुटी दै. 'पुढारी'च्या पाहणीत आढळून आल्या.

कै. दशरथ बळीबा भानगिरे रुग्णालय, महंमदवाडी (हडपसर)

छातीत दुखतंय… पाच फुटांवरून तपासणी
छातीत दुखतंय म्हणून सकाळी दहा वाजता महंमदवाडी येथील कै. दशरथ बळीबा भानगिरे रुग्णालयात पोहचलेला रुग्ण… डॉक्टरांनी
पाच फुटांवरूनच केलेली तपासणी आणि लिहून दिलेली औषधे… औषधे वाटप करणाराच केसपेपरही देतो… अशी अवस्था दवाखान्यात पाहायला मिळाली. दवाखान्यात एक डॉक्टर आणि तीन नर्स एवढ्यावरच रुग्णांच्या आरोग्याची भिस्त आहे. केसपेपर काढून देणारा कर्मचारीच औषध वाटपाला असून, दोन सहायक आणि एक शिपाई एवढेच मनुष्यबळ आहे. सकाळी नऊ वाजता लसीकरणासाठी वेळ दिलेली असून, तब्बल पाऊण तास नर्सच उपलब्ध नसल्याने रुग्णांना ताटकळत थांबावे लागले. दवाखान्याच्या पाठीमागील बाजूस दोन शौचालये असून, ते दोन्ही केवळ स्टाफसाठीच असल्याची सूचना लावण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांसाठी शौचालयाचीही व्यवस्था नसल्याचे समोर आले आहे.

कर्मचार्‍यांचा उद्धटपणा
डॉक्टर वगळता इतर सर्वांचे वागणे उद्धतपणाचे असल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे शिपाई वगळता इतर सर्व जण वेळेवर आले नाहीत. त्या ठिकाणी बायोमेट्रिक हजेरीची यंत्रणा आढळून आली नाही.

ताटकळत बसण्याची वेळ 
दोन ते तीन महिन्यांपासून या दवाखान्यात येत आहे. या ठिकाणी फक्त ओपीडी आणि लसीकरण, या दोनच सुविधा उपलब्ध असून, इतर सुविधांसाठी दुसर्‍या दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला जातो. लहान मुलांसाठी इंजेक्शन आणि लसीकरण डोस सकाळी 9 वाजल्या पासून सुरुवात होते. परंतु, कर्मचारी कधीही वेळेवर येत नाहीत. त्यामुळे रुग्णांना ताटकळत बसावे लागते.
                                                                – दत्तात्रय जत्रे (नांदेड, महंमदवाडी)

शिवशंकर पोटे दवाखाना, पद्मावती

औषधासाठी बाटली घेऊन या…
गुरुवारी सकाळी कपाळाला मोठी जखम झालेला एक रुग्ण दवाखान्यात आला. बाहेरील बाकड्यावर बसून डॉक्टरांनी त्याला पाहिले. मात्र, फक्त मलमपट्टी करून दिली व टाके घालण्याची व्यवस्था नसल्याचे सांगत दुसर्‍या रुग्णालयात जाण्यास सांगितले. प्रतिनिधीने सर्दी-खोकला झाल्याचे सांगितल्यावर डॉक्टरांनी बाहेरील खिडकीवर जाऊन औषधे घेण्यास सांगितले. प्रतिनिधीने केसपेपर दाखवून औषधे मागितल्यावर फक्त गोळ्यांची पाकिटे देत, खोकल्याच्या औषधासाठी खालील दुकानांमधून बाटली घेऊन या, असे सांगितले. आजूबाजूला विचारणा करूनही बाटली मिळाली नाही. सुरक्षारक्षकाला विचारले असता, समोरील बांगड्यांच्या दुकानात 10 रुपयांना बाटली मिळत असल्याचे सांगितले. मात्र, बांगड्यांचे दुकान सकाळी उघडले नव्हते. त्यामुळे नाइलाजास्तव एक पाण्याची बाटली विकत घेऊन ती मोकळी करून त्यामध्ये औषध घेऊन जावे लागले. स्वच्छतागृह नाही – रुग्णांकरिता स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याचे पाहणीदरम्यान समोर आले. एका दरवाजाच्या वरील बाजूस 'स्वच्छतागृह' असे लिहिले होते. मात्र, त्याला बाहेरून कुलूप लावले होते.

छत्रपती शिवराय दवाखाना, येरवडा

जेवणाची सुटी झाली… उद्या या…
दवाखान्यात दुपारी बरोबर एक वाजता केसपेपर देणे बंद करण्यात आले. गुरुवार असल्याने जेवणाच्या सुटीनंतर गर्भवती स्त्रियांची तपासणी करण्यात येणार होती. त्यामुळे दवाखान्यात बोटांवर मोजण्याइतपत रुग्ण होते. दुपारनंतर ओपीडी बंद असल्याने दवाखान्यात आलेल्या रुग्णाचा केसपेपर काढून त्याला औषधे देणे गरजेचे असताना त्याला दुसर्‍या दिवशी या, असा निरोप देण्यात आला. उद्या सकाळी दहानंतर किंवा दुपारी तीननंतर या, असे सांगण्यात आले. दवाखाना स्वच्छ असला तरी परिसर मात्र अस्वच्छ होता. दुपारी एकच्या सुमारास रुग्ण बसण्याची जागा स्वच्छता कर्मचारी स्वच्छ करताना दिसून आले. या वेळी आलेल्या गर्भवती स्त्रियांना जागेवरून उठवून स्वच्छता करण्याची तत्परता महिला कर्मचार्‍याने दाखवली. दवाखाना परिसरात पुरेशी स्वच्छतागृहे आहेत. मात्र, तेथील भांड्यात लाकडी दांडे, प्लास्टिकच्या बाटल्या पडल्या होत्या. त्यामुळे प्रत्यक्षात वापरण्यायोग्य नव्हती. स्वच्छतागृहासमोरील ड्रेनेज तुडुंब भरून वाहत होते. बहुतांश नळ व्यवस्थित बंद न केल्याने पाणी वाया जात होते. काही स्वच्छतागृहांचे दरवाजेही तुटलेल्या परिस्थितीत दिसून आले.

महापालिका दवाखाना, कात्रज

साडेचारलाच दवाखाना बंद
दवाखान्याची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच… मात्र, दवाखाना बंद होतो तो सायंकाळी साडेचार वाजता अन् या वेळी दवाखान्यातील डॉक्टरही गायब झाल्याचे पाहणीत दिसून आले. दवाखाना लवकर बंद केल्याने रुग्णांना घरी परतावे लागले. स्थानिक नागरिकांनीही दवाखाना लवकर बंद होत असल्याचे सांगितले. प्रतिनिधीने 4.45 वाजण्याच्या सुमारास तेथील महिला सुरक्षारक्षकांना डॉक्टर आहेत का? पोटात दुखत आहे, असे विचारल्यावर दवाखाना बंद झाल्याचे सांगितले. प्रतिनिधीने त्यांना फलकावर दवाखाना बंद होण्याची वेळ पाच वाजताची असल्याचे सांगितल्यावर महिला सुरक्षारक्षकाने दवाखाना दररोज साडेचारला बंद होत असल्याचे सांगितले. दवाखान्यात स्वच्छताही नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

महापालिका दवाखाना, वडगाव

गर्भवतींसाठी दुपारीच ओपीडी बंद
वडगावमधील महापालिकेच्या दवाखान्याची ओपीडी सर्वसामान्यांसाठी गर्भवतींच्या तपासणीसाठी प्रत्येक गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता बंद होते. दुपारी एक वाजता दोन सुरक्षारक्षक बाहेर थांबून नागरिकांना सांगत होत्या. काही गर्भवती महिला बाहेर थांबलेल्या होत्या, तर काही महिलांशी कर्मचारी संवाद साधत होते. ओपीडी बंद झाल्याने सर्वसामान्यांना दवाखान्यामध्ये जाता आले नाही. दरम्यान, दवाखान्याचा फलक आजूबाजूला दिसून आला नाही. परंतु, विविध आरोग्य अभियानांच्या बोर्डवरून कळते की येथे दवाखाना आहे. दवाखान्यावर प्राथमिक शाळेचा फलक आहे. परिसरामध्ये स्वच्छता दिसून आली. काही वेळाने एक गर्भवती महिला तपासणीसाठी दवाखान्यामध्ये आली. त्यांची तपासणी झाल्यानंतर बाहेर आल्या. त्या म्हणाल्या की, मी याच दवाखान्यामध्ये तपासणी करते. चांगली सुविधा आणि स्टाफ चांगला असल्याने सोईस्कर ठरते. तपासणीसाठी स्वतंत्र वार दिल्याने इतरांची गर्दी नसते. दवाखान्यामधील कर्मचारी इतरांना कुणाला येऊ देत नाहीत. याशिवाय अनेकदा सोबत कुणी नसेल, तर येथील कर्मचारी मदतही करतात.

विजयाबाई शिर्के दवाखाना, कर्वेनगर

वेळेआधीच केसपेपर खिडकी बंद
वेळ दुपारी 4.30 ची… कै. जयाबाई शिर्के दवाखान्याच्या बाहेर सहा-सात महिला बसल्या होत्या. सर्दी आणि अंगदुखीचा त्रास होत असल्याचे सेविकेला सांगितले. मात्र, मंगळवार आणि गुरुवार फक्त गर्भवती महिलांची तपासणी होत असल्याने इतर रुग्णांना तपासले जात नसल्याचे संबंधित महिलेने सांगितले. उद्या 9.30 नंतर या, असे त्यांनी सांगितले. आत्ता सर्दीने खूप डोके दुखत आहे, आज औषध मिळणार नाही का? असे विचारले असता नकारार्थी उत्तर मिळाले. दवाखाना सुरू होण्याची वेळ 9 वाजता असतानाही दुसर्‍या दिवशी 9.30 वाजता या, असे सांगण्यात आले. दवाखाना बंद होण्याची वेळ दुपारी 1 वाजता असते. मात्र, केसपेपर काढण्याची खिडकी 12.30 वाजताच बंद होते. औषध हवे असल्यास बाटली घेऊन या, असेही सांगितले. स्वच्छतागृहाबाबत विचारणा केली असता स्वच्छतागृह नसल्याचे त्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news