Lok Sabha Elections 2024 : पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात ५५ टक्के मतदान, त्रिपुरामध्ये सर्वाधिक तर बिहारमध्ये सर्वात कमी मतदान

Lok Sabha Elections 2024 : पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात ५५ टक्के मतदान, त्रिपुरामध्ये सर्वाधिक तर बिहारमध्ये सर्वात कमी मतदान

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उष्णतेची लाट असूनही देशभर मतदान चांगल्या प्रमाणात आणि शांततेत पार पडले. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेच्या मतदानासह १८ व्या लोकसभेसाठी २१ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी मतदान झाले. २१ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदानाचा सरासरी आकडा संध्याकाळी ७ वाजतापर्यंत ६०% पेक्षा जास्त होता. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी सात वाजेपर्यंत सर्वात जास्त मतदान त्रिपुरा (७९.९०%) येथे तर सर्वात कमी मतदान बिहारमध्ये (४७.४९%) पार पडले. तर महाराष्ट्रात ५५.२९ % मतदान पार पडले.

देशात १८ व्या लोकसभेसाठी मतदानाचा पहिला टप्पा शुक्रवारी (१९ एप्रिल) पार पडला. यामध्ये अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेच्या निवडणुकाही पार पडला. दरम्यान, लोकसभेच्या १०२ जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. यामध्ये महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली भंडारा- गोंदिया या ५ मतदारसंघांचा समावेश आहे.

दरम्यान, या निवडणुकीत निवडणूक आयोगाने विविध भागांसह आदिवासी भागातील मतदानासाठी सुविधा देण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे छत्तीसगडमधील बस्तरमधील ५६ गावांनी त्यांच्याच गावात उभारलेल्या मतदान केंद्रावर पहिल्यांदाच मतदान केले. महाराष्ट्रात गडचिरोली-चिमूर, हेमलकसा अशा ठिकाणी काही बूथवर स्थानिक आदिवासी बोली वापरली गेली ज्यामध्ये सर्व संबंधित माहिती होती.

शुक्रवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केली. मात्र या टक्केवारीत बदल होऊ शकतो असेही आयोगाच्या वतीने सांगण्यात आले. काही ठिकाणी उशिरापर्यंत मतदान सुरू होते. त्या सगळ्यांची एकूण स्पष्ट माहिती येण्यास उशीर होऊ शकतो, असेही आयोगाने सांगितले.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी सात वाजेपर्यंत विविध राज्यांमध्ये पार पडलेल्या मतदानाची टक्केवारी

अंदमान निकोबार- 56.87%
अरुणाचल प्रदेश- 65.46%
आसाम- 71.38%
बिहार- 47.49%
छत्तीसगड- 63.41%
जम्मू कश्मीर- 65.8%
लक्षद्वीप- 59.2%
मध्य प्रदेश- 63.33%
महाराष्ट्र- 55.29%
मणिपूर- 68.72%
मेघालया- 70.26%
मिझोरम- 54.18%
नागालँड- 56.77%
पॉंडिचेरी- 73.25%
राजस्थान- 50.95%
सिक्कीम- 68.6%
तामिळनाडू- 62.19%
त्रिपुरा- 79.90%
उत्तर प्रदेश- 57.61%
उत्तराखंड- 53.64%
पश्चिम बंगाल- 77.57%

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news