पुढारी ऑनलाईन डेस्क : Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने तामिळनाडूमध्ये पट्टाली मक्कल काची (पीएमके) सोबत युती केली आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटप झाले आहे. डॉ. एस. रामदास अंबुमणी यांच्या नेतृत्वाखालील पीएमके राज्यातील 10 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. या युतीच्या जोरावर भाजपला दक्षिण भारतात आपले अस्तित्व मजबूत करण्यास मदत होईल असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई आणि पीएमकेचे संस्थापक रामदास अंबुमणी यांनी त्यांच्या थिलापुरम येथील निवासस्थानी करारावर स्वाक्षरी केली. यावेळी डॉ. एस रामदास म्हणाले की, 'देशाच्या हितासाठी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही एनडीएमध्ये सामील झालो आहोत. तामिळनाडूतील जनतेला बदलाची अपेक्षा आहे आणि ती पूर्ण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. एनडीए केवळ तामिळनाडूतच नव्हे तर संपूर्ण भारतात मोठा विजय मिळवेल आणि पीएम मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील,' असे त्यांनी सांगितले. (Lok Sabha Elections 2024)
भाजपचे अन्नामलाई यांनी, 'पीएमकेने एनडीएला 400 जागा जिंकण्यास मदत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. ते भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील झाल्याने तामिळनाडूतील राजकीय परिस्थिती बदलली आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तामिळनाडूमध्ये बदल घडवून आणणे हे आपले उद्दिष्ट आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीएला मोठा विजय मिळेल. यासोबतच 2026 मध्ये राज्यात मोठा राजकीय बदल होणार आहे,' असा विश्वास व्यक्त केला आहे. (Lok Sabha Elections 2024)
पीएमके हा वान्नियार समुदायाचे वर्चस्व असलेला पक्ष आहे आणि राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये जसे की वेल्लोर, रानीपेट, कांचीपुरम, थिरुवल्लुवर इत्यादींमध्ये लक्षणीय प्रभाव आहे. गेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत पीएमकेने 5 जागा जिंकल्या होत्या. त्याच वेळी, पक्षाने 3.8 टक्के मते मिळवून राज्यात चौथ्या क्रमांकावर स्थान मिळविले होते. 2014 मध्ये पीएमकेने भाजपसोबत लोकसभा निवडणूक लढवली होती. धर्मपुरी लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार अंबुमणी रामदास विजयी झाले होते.
18 मार्च रोजी भाजप आणि पीएमके यांनी युतीची घोषणा केली. त्यानंतर दोन्ही पक्षांमधील जागावाटपावर 19 मार्च रोजी शिक्कामोर्तब करण्यात आला. ज्यानुसार तामिळनाडूतील 39 पैकी 10 जागा पीएमकेच्या वाट्याला गेल्या आहेत. पीएमकेचे संस्थापक रामदास बुधवारी (दि. 20) त्यांच्या उमेदवारांची घोषणा करतील असे वृत्त आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सालेममध्ये मंगळवारी जाहीर सभा आहे. तेथे पीएमकेचे नेते डॉ. एस. रामदास अंबुमणी पंतप्रधानांच्या भाषणावेळी सहभागी होणार आहेत.
पीएमकेचे अध्यक्ष रामदास म्हणाले, 'पीएमके गेल्या दहा वर्षांपासून दिल्लीतील एनडीएचा भाग आहे. परंतु आता आम्ही प्रत्यक्षपणे एनडीएत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. पीएमकेने तामिळनाडूमध्ये भाजपसोबत युती केली आहे आणि जागावाटप निश्चित केले आहे. भाजप राज्यातील 39 पैकी 29 जागांवर निवडणूक लढवणार असून पीएमके 10 जागांसह रिंगणात उतरणार आहे.'
एनडीएचे घटक पक्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 400 जागा जिंकण्याचा नारा देत आहेत. या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी भाजप युतीचा विस्तार करण्यात व्यस्त आहे. याच रणनितीचा भाग म्हणजे भाजप एनडीएला दक्षिण भारतात घेऊन जात आहे. या अनुषंगाने भाजपने आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडूंसोबत युती केली आहे. तर कर्नाटकात जेडीएससोबत यापूर्वीच करार केला आहे. आता तामिळनाडूमध्ये पक्षाने पीएमकेला सोबतीला घेऊन एनडीएचा विस्तार केला आहे. याचप्रमाणे तेलंगणा आणि केरळमध्ये ते मित्र पक्षाचा शोध घेत आहेत.