Lok Sabha Election 2024 | शांतिगिरी महाराजांच्या अर्जाने महायुतीत संभ्रम, शिंदे गटाचे कानावर हात तर राष्ट्रवादी…

Lok Sabha Election 2024 | शांतिगिरी महाराजांच्या अर्जाने महायुतीत संभ्रम, शिंदे गटाचे कानावर हात तर राष्ट्रवादी…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिकच्या जागेवरून महायुतीत अद्याप रस्सीखेच सुरू असताना राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी शांतिगिरी महाराज यांनी शिवसेना शिंदे गटाच्या नावाने अर्ज दाखल केल्याने महायुतीत खळबळ उडाली आहे. शांतिगिरी महाराजांना शिवसेनेची उमेदवारी ही केवळ अफवा असल्याचे सांगत नाशिकच्या उमेदवारीचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून मंगळवारी (दि.३०) सायंकाळपर्यंत जाहीर केला जाईल, असा दावा खासदार हेमंत गोडसे यांनी केला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार नाशिकच्या उमेदवारीसाठी ज्यांचे नाव घोषित करतील, त्यांचा आम्ही प्रचार करू, अशी प्रतिक्रिया 'राष्ट्रवादी'च्या अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. (Lok Sabha Election 2024)

नाशिकमधून महायुतीची उमेदवारी मिळविण्यासाठी शांतिगिरी महाराजांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप कुठलाही निर्णय महायुतीकडून जाहीर झालेला नाही. किंबहुना नाशिकची जागा महायुतीत भाजपला, शिवसेना शिंदे गटाला की राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला हे देखील अद्याप निश्चित होऊ शकलेले नाही. उमेदवारीसाठी दररोज तिन्ही पक्षांकडून नवनवीन नावे समोर येत आहेत. सोमवारी शांतीगिरी महाराजांनी थेट शिवसेना शिंदे गटाच्या नावाने अर्ज दाखल करत सर्वांनाच धक्का दिला. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना देखील याविषयी माहिती नव्हती. महायुतीकडून उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा शांतिगिरी महाराजांनी कायम ठेवली आहे. मात्र त्यांची ही भूमिका शिंदे गटाच्या पदाधिकारी तसेच इच्छूकांनी रूचलेली नाही. नाशिकमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेले गोडसे यांनी यावर भाष्य केले आहे. नाशिकच्या जागेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सायंकाळपर्यंत उमेदवाराच्या नावाची घोषणा करतील. शांतिगिरी महाराजांनी त्यांच्या अर्जासोबत पक्षाचा एबी फॉर्म जोडलेला नाही. त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, अशी प्रतिक्रिया गोडसे यांनी दिली आहे. भुजबळ यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार एकत्रितरित्या उमेदवारीचा प्रश्न सोडवतील. नाशिकच्या उमेदवाराची घोषणा करतील. त्यानंतर ज्याचे नाव जाहीर होईल, त्याचा प्रचार आम्ही करू, असे भुजबळ यांनी सांगितले आहे.

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news