Lok Sabha Elections 2024 | बिहार : भाजपप्रणीत ‘एनडीए’ने कंबर कसली

Lok Sabha Elections 2024 | बिहार : भाजपप्रणीत ‘एनडीए’ने कंबर कसली

Published on

बिहार वार्तापत्र : धीरज कुमार

जयप्रकाश नारायण यांनी जेथून संपूर्ण क्रांतीची हाक दिली, त्या बिहारमध्ये निवडणुकीचे वातावरण तापत चालले आहे. 'एनडीए'च्या नेतृत्वाखालील महागठबंधन आणि विरोधी आघाडी अशा दोन्हीकडून उमेदवारांची नावे आणि जागावाटपावर चर्चेच्या फेर्‍या झडत आहेत. लवकरच यावर शिक्कामोर्तब होऊन प्रचाराचा धुरळा उडणार आहे. (Lok Sabha Elections 2024)

लोकसभेच्या निवडणुकांची (Lok Sabha Elections 2024) घोषणा होताच बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही मोर्चा (एनडीए) कामाला लागला आहे. यातील मुख्य मुद्दा आहे तो जागावाटपाचा आणि त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करणे. त्यासाठी मुख्यमंत्री नितीशकुमार जातीने सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. राजीव रंजन सिंह, लाल सिंह आणि राज्यसभेचे खासदार संजय झा यांच्याशी त्यांनी नुकतीच जागावाटपाच्या विषयावर आपल्या शासकीय निवासस्थानी विस्तृत चर्चा केली. यात जनता दल संयुक्तला कोणत्या संभाव्य जागा मिळू शकतात आणि उमेदवार कोण असतील, यावर विचारविनिमय करण्यात आला. या महागठबंधात भाजप हाही प्रमुख पक्ष असल्यामुळे जागावाटपाचा विषय लवकर हातावेगळा व्हावा या दृष्टीने आघाडीतील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. संजय झा यांच्या मते येत्या दोन-तीन दिवसांत जागावाटप आणि उमेदवारांच्या नावावर मोहर उमटवली जाऊ शकते. कोणता पक्ष कुठल्या जागा लढविणार, उमेदवार कोण असणार यासारखा सगळा तपशील आम्ही लवकरच बिहारच्या जनतेसमोर मांडणार आहोत, असेही त्यांनी पाटण्यात माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

'एनडीए'बद्दल बोलायचे तर महागठबंधनमध्ये भाजप, जनता दल संयुक्त, चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष (रामविलास पासवान गट), केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांचा राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष, माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचा हिंदुस्थानी आवाम मोर्चा (हम) आणि माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा (रालोमो) या पक्षांचा समावेश आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप 17 जागांवर निवडणूक लढवू शकतो, तर जदयूला 16 जागा मिळण्याचे संकेत आहेत. चिराग पासवान यांच्या पक्षाला पाच जागा, मांझी आणि कुशवाह यांच्या पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळू शकते. सध्या वदंता अशी आहे की, कुशवाह यांना एकही जागा दिली जाणार नाही. कारण, माझ्या पक्षाला पुरेशा जागा न मिळाल्यास 'एनडीए'पासून फारकत घ्यायलाही मी मागे-पुढे पाहणार नाही, असा इशारा त्यांनी जाहीरपणे दिला आहे. दिवंगत रामविलास पासवान यांचा हा हक्काचा मतदारसंघ म्हणजे हाजिपूर. सध्या त्यांचे चिरंजीव चिराग आणि बंधू पशुपती पारस यांच्यात या मतदार संघावरून टोकाचा वाद निर्माण झाला आहे. दोघेही याच जागेबद्दल ठाम आहेत. कदाचित दोघेही या मतदार संघातून निवडणूक लढविण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे, विरोधी राजद आणि काँग्रेस यांनी जागावाटपाची बोलणी सुरू केली आहेत. विरोधकांच्या आघाडीत सीपीआय (एमएल), सीपीआय, सीपीआय (मार्क्सिस्ट) हे अन्य पक्ष आहेत. सूत्रांकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार राजद यावेळी 28 जागा लढवू शकतो. काँग्रेसच्या वाट्याला नऊ जागा येऊ शकतात, तर सीपीआय (एमएल) या पक्षाला दोन व सीपीआयला एक जागा दिली जाईल, अशी शक्यता आहे. गेल्या वेळी या राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावातात काँग्रेसने किशनगंज ही एकमेव जागा जिंकून खाते खोलले होते. (Lok Sabha Elections 2024)

तेजस्वी म्हणतात, हवा बदलू लागली

यावेळी आपल्याला चांगले यश मिळेल, असा दावा 'राजद'चे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केला आहे. बिहारमध्ये राजकीय हवा बदलत चालली आहे आणि तुम्हाला निकालानंतर त्याची प्रचिती येईल, असा निर्वाळा त्यांनी दिला आहे. एकूणच बिहारमध्येही अन्य राज्यांप्रमाणे निवडणूक ज्वर वेगाने वाढत चालल्याचे चित्र दिसून येते.

2019 मध्ये 'एनडीए'चा बोलबाला

गेल्या म्हणजेच 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 'एनडीए'ने बिहारमध्ये विरोधकांचा सुपडासाफ केला होता. त्यावेळी 40 पैकी 39 जागा 'एनडीए'ने जिंकल्या होत्या. भाजपला तेव्हा 17, जदयूला 16, तर चिराग पासवान यांच्या एकत्रित लोजपाने सहा जागांवर विजय मिळवला होता.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news