Lok Sabha Election 2024 : …म्हणून ४०० जागांचा संकल्प; अमित शहांनी सांगितली नेमकी कारणे

Lok Sabha Election 2024 : …म्हणून ४०० जागांचा संकल्प; अमित शहांनी सांगितली नेमकी कारणे
Published on
Updated on

सुनील नाळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळच्या लोकसभा निवडणुकीत 'चारशे पार' अशी घोषणा केल्यानंतर त्याची देशपातळीवर भरपूर चर्चाही झाली. तथापि, यामागील भाजपची नेमकी भूमिका काय, याचा सविस्तर खुलासा अमित शहा यांनी राजस्थानातील पाली येथे बोलताना केला आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएला चारशे जागा मिळाल्या, तर देशाला जगात तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनविणे शक्य होईल आणि आरक्षणाची मर्यादाही वाढवता येईल. पंतप्रधान मोदी हे आरक्षणाचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे ओबीसी असो, एससी असो किंवा एसटी. यापैकी प्रत्येक घटकाला आरक्षण मिळाले पाहिजे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.

जेव्हा 2019 मधील लोकसभा निवडणुकीत जनतेने आम्हाला तीनशेहून अधिक जागांवर विजयी केले, तेव्हा आम्ही 370 कलम रद्द केले. अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर नेली. माजी जवानांसाठी 'वन रँक वन पेन्शन' योजनेची अंमलबजावणी केली. तीन तलाकची कालबाह्य प्रथा कायद्याने बंद केली. महिलांना 33 टक्के आरक्षणाची हमी दिली. सोबत अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्यात आले. आता देशाला जागतिक तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनविण्याचा संकल्प आम्ही केला आहे, असे शहा यांनी स्पष्ट केले.

मोदी आणि राहुल गांधी

लक्षात घ्या, राहुल गांधी वर्षातून तीन महिने विदेशात सुट्टीवर जातात आणि नरेंद्र मोदी एकदाही सुट्टी न घेता कार्यरत आहेत. दिवाळीसुद्धा ते सीमा भागात जाऊन तेथील जवानांसोबत साजरी करतात. एकीकडे दहशतवाद आणि नक्षलवादाचे संकट आणखी गहिरे करणारा काँग्रेस पक्ष आहे, तर दुसरीकडे गेल्या दहा वर्षांत दहशतवादाचा सफाया करणारा भारतीय जनता पक्ष आहे. यापैकी तुम्ही कोणाला निवडाल, असा थेट प्रश्नच शहा यांनी उपस्थित केला.

मतपेढी गमावण्याची काँग्रेसला भीती

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अयोध्येचा विषय काँग्रेसने बासनात बांधून ठेवला होता. याचे कारण म्हणजे अल्पसंख्याकांची मते गमावण्याची भीती त्यांना सतावत होती. राम जन्मभूमी प्रकरण काँग्रेसने मुद्दामहून लटकत ठेवले. याच्या उलट, मोदी हे दुसर्‍यांदा पंतप्रधान बनले तेव्हा श्रीराम मंदिराचे भूमिपूजनही झाले आणि काही काळातच मंदिर साकारले. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे निमंत्रण काँग्रेसला देण्यात आले, तेव्हा त्यांच्या नेत्यांनी त्याकडे पाठ फिरवली. कारण, मुस्लिम समाज नाराज होईल, अशी भीती त्यांना वाटत होती. काँग्रेसचे हे हिणकस राजकारण जाणून घेतले पाहिजे, असे शहा यांनी सांगितले.

आमचे प्राधान्य सांस्कृतिक राष्ट्रवादाला

मोदी सरकारने सांस्कृतिक राष्ट्रवादाला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच आम्ही अयोध्येत भव्य मंदिराची उभारणी केली. काशी विश्वनाथ कॉरिडोर, मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाल कॉरिडोर ही कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. सोमनाथ मंदिराचे कामही वेगाने सुरू असून, अनेक देवस्थानांचा जीर्णोद्धार मोदी सरकार करत आहे. देशातील जनता हे सारे पाहत असून त्यामुळे काँगे्रसचा बेगडी धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा गळून पडला आहे, असा टोलाही शहा यांनी लगावला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news