उर्दू शायर म्हणून देशभरात मान्यता पावलेले काझी सलीम हे १९८० च्या निवडणुकीत संभाजीनगरातून निवडून गेले होते. या निवडणुकीत ११ उमेदवार रिंगणात होते. खरी लढत झाली ती काँग्रेस उमेदवार काझी सलीम आणि अर्स काँग्रेसचे साहेबराव पाटील डोणगावकर. जनता पक्षाने डॉ. टी. एस. पाटील यांना तर रिपाइंने प्रा. एस. टी. प्रधान यांना उमेदवारी दिली होती. काझी सलीम यांनी डोणगावकर यांचा ८७ हजार मतांनी पराभव केला.
तसे काझी सलीम हे प्रारंभी शेतकरी कामगार पक्षाशी संबंधित होते. १९५५ ते ६२ या काळात ते शेकापचे जिल्हा सचिव राहिले. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. १९६२ ते १९७२ या काळात ते विधानपरिषदेचे सदस्य होते. संभाजीनगर मतदारसंघातील मुस्लिम मतदारांची संख्या प्रभावी असल्याने काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. लोकसभेत त्यांनी मराठवाडा रेल्वे रूंदीकरण आणि विकास प्रश्नांवर आवाज उठविला होता.
रूंदीकरणावर त्यांनी सभागृहाबाहेर आंदोलन केल्यामुळे पक्षाने त्यांना नोटीस बजावली होती. त्यास न डगमगता त्यांनी रूंदीकरणाची मागणी सातत्याने लावून धरली होती. काझी सलीम आणि बशर नवाज हे संभाजीनगरचे दोन शायर असे होते की शायरीवर अभ्यास करणार्यांना या दोघांच्या साहित्याची नोंद घ्यावीच लागते. इंदिरा काँग्रेसची संभाजीनगरात स्थापना, जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष मराठवाडा विभाग ही जबाबादरी त्यांनी सांभाळली होती. लोकसभेची एक टर्म पूर्ण झाल्यानंतर काझी सलीम हे राजकारणातून निवृत झाले. हैदराबाद, अलिगढ विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करणार्या काझी सलीम यांचा पिंड साहित्यिकाचा होता. त्यांच्या उर्दू शायरीची दखल घेत त्यांना साहित्य अकादमीचा वली दखनी पुरस्कारही मिळाला होता.
या निवडणुकीत धाराशिव मतदारसंघ राखीव झाला होता. काँग्रेसकडे प्रभावी उमेदवार नसल्याने परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे आमदार टी. एम. सावंत यांना इंदिरा काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यांनी अर्स काँग्रेसचे तुकाराम शृंगारे यांचा ९२ हजार मतांनी पराभव केला. शृंगारे हे तेव्हा केंद्रात मंत्री होते. पण, काँग्रेसच्या लाटेत त्यांचा निभाव लागू शकला नाही. जालना मतदारसंघात पुंडलिक हरी दानवे यांना काँग्रेस नेते बाळासाहेब पवार यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. पवार हे संभाजीनगरचे असले तरी जालन्यावर त्यांची चांगली पकड होती. सहकारी साखर कारखाने, शिक्षणसंस्थांच्या माध्यमातून त्यांनी प्रभावी कार्य केले होते. मराठवाड्याच्या विकास प्रश्नांवर तळमळीने काम करणारा नेता अशी त्यांची ख्याती होती.