पुढारी ऑनलाईन डेस्क: देशाचे माजी उपपंतप्रधान, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना आज (दि.३१) भारतरत्न प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतर पीएम मोदी यांनी अडवाणींसोबतचा अनुभव शेअर करत त्यांच्याबद्दल गौरद्गार काढले आहेत, या संदर्भातील एक्स पोस्ट त्यांनी त्यांच्या अकाऊंटवरून केली आहे. (LK Advanis Bharat Ratna)
पीएम मोदी यांनी म्हटले आहे की, 'लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न बहाल करताना पाहणे खूप खास होते. हा सन्मान म्हणजे आपल्या देशाच्या प्रगतीत त्यांच्या अतुलनीय योगदानाची ओळख आहे. लोकसेवेसाठीचे त्यांचे समर्पण आणि आधुनिक भारताला आकार देण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका यांनी आपल्या इतिहासावर छाप उमटवली आहे. गेल्या अनेक दशकांमध्ये त्यांच्यासोबत खूप जवळून काम करण्याची संधी मिळाली याचा मला अभिमान आहे. (LK Advanis Bharat Ratna)
प्रकृती अस्वास्थ्यामुळे अडवाणी शनिवारी राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभाला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अडवाणींच्या घरी जाऊन त्यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरही उपस्थित होते. (LK Advanis Bharat Ratna)
राष्ट्रपतींनी शनिवारी (३० मार्च) राष्ट्रपती भवनात ४ व्यक्तिमत्त्वांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान केले. यामध्ये माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि कृषी शास्त्रज्ञ डॉ. एमएस स्वामीनाथन यांचा समावेश आहे. राष्ट्रपती भवनात चारही व्यक्तींच्या कुटुंबीयांना हा सन्मान मिळाला. नरसिंह राव यांचे पुत्र पीव्ही प्रभाकर राव, चौधरी चरण सिंह यांचे नातू जयंत चौधरी, कर्पूरी ठाकूर यांचे पुत्र मुलगा रामनाथ ठाकूर आणि एमएस स्वामीनाथन यांच्या कन्या नित्या राव यांनी हा पुरस्कार स्विकारला.