शिर्डी : लाखो शेतकर्‍यांना पशुधन एक्स्पो वरदान ठरणार : मुख्यमंत्री शिंदे

शिर्डी : लाखो शेतकर्‍यांना पशुधन एक्स्पो वरदान ठरणार : मुख्यमंत्री शिंदे

शिर्डी; पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्या पशुधन खात्याच्या माध्यमातून व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या विशेष प्रयत्नांतून आयोजित करण्यात आलेल्या पशुधन महाएक्स्पो राज्यातील शेतकर्‍यांना वरदान ठरणार असल्याचा ठाम विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. शिर्डी येथे आयोजित पशुधन एक्स्पोच्या समारोपप्रसंगी बोलत होते.

व्यासपीठावर ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा., खा. डॉ. सुजय विखे पा., खा. सदाशिव लोखंडे, आ. बबनराव पाचपुते, आ. मोनिकाताई राजळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जि. प. माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, विठ्ठलराव लंघे, 'महानंद'चे अध्यक्ष राजेश परजणे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, मनीषा कायंदे, माजी आ. वैभव पिचड, विवेक कोल्हे, अनिता जगताप आदी उपस्थित होते.

शेतकर्‍यांना न्याय देणारे हे सरकार आहे. शेतकरी अडचणीत आहे, म्हणून राज्याच्या अर्थ संकल्पातील पंचामृतमध्ये पहिले स्थान शेतकर्‍यांना दिले. शेतकर्‍यांना शेतकरी सन्मान योजनेतून 12 हजार कोटी देत आहोत. दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना सुमारे 21 हजार रु. देण्याची योजना राबवित आहोत. शेती महामंडळाच्या माध्यमातून 10 हजार रुपयांची बिनव्याजी कर्ज योजना अंमलात आणणार आहोत. पंचामृतमध्ये शेतकर्‍यांना प्राधान्य आहे, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून स्त्रीचा सन्मान करून मुलींच्या 18 वर्षांपर्यंत 1 लाख रुपये मिळतील, अशी योजना राबवित आहोत. सहकारातील साखर उद्योग हा अडचणीत असताना देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांनी 10 हजार कोटींचा इन्कम टॅक्स माफ केला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

सहकाराच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रात अ. नगर जिल्हा आघाडीवर आहे. यातुन शेतकर्‍यांचा विकास साधला जात आहे. हा विकास राज्यातही आघाडीवर असल्याचे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केले. मंत्री महाजन म्हणाले, या एक्स्पोमध्ये 12 कोटींचा रेडा हा चर्चेचा विषय ठरला. तो मी बघणार आहे, असे सांगत हा जिल्हा सगळ्याच क्षेत्रात पुढारलेला आहे. नुकतेच अ. नगर जिल्हा बँकेच्या शिर्डी शाखेच्या नुतन इमारतीचे उद्घाटन केले. आशिया खंडातील सहकारातील नंबर एकची ही संस्था आहे.

माझ्या खात्याचे जेवढे बजेट नाही, तेवढ्या 9 हजार कोटींच्या ठेवी आहेत, असे गौरवोद्गार काढून मंत्री महाजन म्हणाले, या जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले मला म्हणतात की, 'तेवढं आमच्या आमदारकीचं बघा,' पण, अशी संस्था माझ्या ताब्यात असती तर मी आमदारकी मागितलीच नसती. आमदारकीमध्ये आहे तरी काय, असा सवाल करीत त्यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचे कौतुक केले.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. म्हणाले की, भाजप- सेनेचे सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकर्‍यांच्या दुधाला चांगला भाव मिळाला, मात्र दुधाची भेसळ करू नका. दुधाची भेसळ करणार्‍याला समाज अन् देवही माफ करणार नाही. शिर्डीमध्ये श्रीसाईबाबांच्या जिवनावर आधारित थीम पार्कसाठी शासनाने 50 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी साडेपाच हजार कोटींचा निधी मंजूर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

त्या कालव्यांचे उद्घाटन पुढच्या महिन्यात करावे, अशी अपेक्षा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली. या सरकारच्या माध्यमातून गरिबांच्या घरासाठी 600 रुपये ब्रासने वाळू मिळून गरिबांच्या घराचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे मंत्री पा. विखे म्हणाले. याप्रसंगी खा. सुजय विखे, खा. सदाशिव लोखंडे यांची भाषणे झाली. एक्स्पोमध्ये सहभागी झालेल्या पशुपालकांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

अन् एकच हशा पिकला..!
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, या एक्स्पोमध्ये लाखो शेतकरी येणार म्हणून मला यावचं लागलं. देशात सहकार चळवळीचा पाया या भूमीत रोवला गेला. श्रीसाईबाबांच्या पवित्र भूमीत पशुधन एक्स्पो पार पडला, ही बाब उल्लेखनीय आहे. सुमारे 7 लक्ष शेतकरी या एक्सपोला भेट देऊन गेले, हे यश आहे, अशी मोठी कामं येथे होतात, असे म्हणत, मंत्री विखे यांच्याकडे नेत्र कटाक्ष टाकत ते उद्गारले की, तसं पाहिलं तर विखेंची कामे ही मोठीचं असतात, असं म्हणताच एकच हास्यकल्लोळ उडाला.

साई थीम पार्कला रुपयाही कमी पडू देणार नाही
श्रीसाईबाबांचे कृपा आशीर्वाद आहेतच, मात्र जनतेचेही आशीर्वाद आहेत. त्यांच्या आशिर्वादाने हे सरकार सत्तेत आहे. श्रीसाईबाबांच्या जीवन पटावर शिर्डीत साई थीम पार्क उभारण्यासाठी मागणी केली आहे. या प्रकल्पाला रुपयाही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

बॉबी, भिंगरी आणि तुमचं रॉकेटही आघाडीवर..!
शेतकरी अडचणीत आहे. यासाठी त्यांना शाश्वत व्यवसायाची जोड महत्वाची आहे. सहकाराच्या माध्यमातून जे काम नगर जिल्हा करीत आहे, त्याला तोड नाही. नगर जिल्हा नुसतं शिक्षण, दूध व्यवसाय अन् बँकाच नव्हे तर जिल्ह्यातील बॉबी, भिंगरी आणि तुमचं रॉकेटही आघाडीवर आहे, असे म्हणताच सभेत एकच हास्यकल्लोळ उडाला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news